राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील आणखी एक हिरो, मेगा ऑक्शनपूर्वीच उलथापालथ

| Updated on: Sep 20, 2024 | 3:35 PM

राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेतील पहिलं जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर राजस्थान रॉयल्सची झोळी रितीच आहे. त्यामुळे यंदा राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीने मेगा ऑक्शनपूर्वीच संघ बांधणी सुरु केली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील हिरोची आता संघात एन्ट्री झाली आहे.

राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील आणखी एक हिरो, मेगा ऑक्शनपूर्वीच उलथापालथ
Follow us on

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. किती खेळाडू रिटेन करता येतील याबाबत अजून तरी काहीच समोर आलेलं नाही. पण मागच्या ऑक्शनवेळी चार खेळाडू रिटेन करण्याची परवानगी होती. मात्र यंदा हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं असताना फ्रेंचायझींनी त्यांच्या परीने संघ बांधणी सुरु केली आहे. खासकरून मार्गदर्शक म्हणून दिग्गज खेळाडूंना ताफ्यात घेतलं जात आहे. झहीर खान लखनौ सुपर जायंट्ससोबत, रिकी पाँटिंग पंजाब किंग्ससोबत आला आहे. दुसरीकडे, टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविड राजस्थान रॉयल्स संघासोबत जोडला गेला आहे. त्याच्याकडे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी आहे. आता या ताफ्यात टी20 वर्ल्डकपच्या आणखी एका हिरोची भर पडली आहे. विक्रम राठोडकडे फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली गेली आहे. द्रविड-राठोड जोडीने टी20 वर्ल्डकप विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता तीन महिन्यानंतर ही जोडी पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स जेतेपदाचं स्वप्न 16 वर्षानंतर पुन्हा एकदा पूर्ण होईल अशी आशा चाहत्यांना आहे.

राजस्थान रॉयल्स संघासोबत काम करण्याची संधी मिळाल्यानंतर विक्रम राठोड खूपच उत्साहित आहे. राठोडने सांगितलं की, ‘मी संघाच्या ध्येयप्राप्तीसाठी पूर्ण योगदान देईल. आमचं लक्ष्य रॉयल्स आणि टीम इंडियासाठी टॉप क्लास प्लेयर तयार करण्यावर आहे. त्यांच्यामुळे जेतेपद मिळवणं सोपं होईल.’ राहुल द्रविडनेही राठोडच्या आतापर्यंतच्या कामगिरीची स्तुती केली आहे. ‘टीम इंडियाला यश मिळवून देत आम्ही एक चांगली ओळख निर्माण केली आहे. आता आम्ही एकत्रितपणे चांगले खेळाडू तयार करण्यासाठी उत्साहीत आहोत.’, असं राहुल द्रविडने सांगितलं.

विक्रम राठोड भारतासाठी 6 कसोटी आणि 7 वनडे सामने खेळला आहे. 2012 मध्ये टीम इंडियाच्या निवड समितीवर होते. नॅशनल क्रिकेट अकादमीत राहुल द्रविडच्या कोचिंग स्टाफमध्ये होता. 2019 मध्ये बीसीसीआयने त्याच्याकडे फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली होती. पाच वर्षे त्याने ही भूमिका बजावली आणि 2019 मध्ये त्याचा कार्यकाळ टी20 वर्ल्डकप विजयासह संपला. आता राजस्थान रॉयल्सला जेतेपद मिळवून देण्यासाठी ही जोडी काम करणार आहे. राजस्थानने 2008 मध्ये जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 2022 मध्ये अंतिम फेरीत पराभूत झाली होती. तर मागच्या पर्वात क्वॉलिफायर 2 फेरीतून गाशा गुंडाळावा लागला होता.