IPL 2025 : केएल राहुलने का सोडली लखनौ सुपर जायंट्सची साथ? स्वत:च खुलासा करत म्हणाला…
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलावात 1574 खेळाडू उतरले आहे. यात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल देखील आहे. केएल राहुलला रिलीज केलं की त्याने फ्रेंचायझी सोडली हे मात्र गुलदस्त्यात आहे. असं असताना केएल राहुलने पहिल्यादाच प्रतिक्रिया दिली आहे.
आयपीएल 2025 मेगा लिलावाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दहा फ्रेंचायझी आवडत्या खेळाडूंना संघात घेण्यासाठी फिल्डिंग लावून बसले आहेत. कोणत्या खेळाडूसाठी किती पैसे खर्च करायचे याचा अंदाज लावून बसले आहेत. दरम्यान, लखनौ सुपर जायंट्सने कर्णधार केएल राहुल याला रिटेन केलं नाही. त्यामुळे तो देखील मेगा लिलावात उतरला आहे. याबाबत बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. मागच्या पर्वात सनरायझर्स हैदराबादकडून पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर लखनौचे मालक संजीव गोयंका यांनी केएल राहुलला खडे बोल सुनावले होते. तेव्हापासून केएल राहुल फ्रेंचायझी सोडणार हे निश्चित होतं. अखेर केएल राहुलने याबाबत मौन सोडलं आहे. स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत केएल राहुलने सांगितलं की, ‘मी नव्याने सुरुवात करू इच्छित होतो. मला पर्याय हवे होते. मी अशा संघात जाऊन खेळू इच्छितो जिथे स्वातंत्र्य असेल. संघाचं वातावरण हलकंफुलकं असेल. कित्येकदा पुढे जात आपल्यासाठी काहीतरी चांगलं पाहायचं असतं.’
लखनौ सुपर जायंट्सपूर्वी केएल राहुल पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसोबत खेळला आहे. त्याने पंजाब किंग्सचं कर्णधारपदही भूषवलं होतं. त्यामुळे केएल राहुलकडे इतर फ्रेंचायझींच्या नजरा असतील. कारण लखनौ सुपर जायंट्स आरटीएम कार्ड वापरणार नाही हे स्पष्ट आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्सने आपल्या कर्णधारही रिलीज केला आहे. त्यामुळे पंजाब किंग्सची केएल राहुलवर नजर असेल. दुसरीकडे, केएल राहुलसाठी आरसीबीनेही फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे मेगा लिलावात केएल राहुलसाठी रस्सीखेच पाहायला मिळू शकते.
KL Rahul said, “I wanted to start fresh, I wanted to explore my options and and I wanted to go and play where I could find some freedom. The team atmosphere would be lighter, sometimes you just need to move away and find something good for yourself”. (Star Sports). pic.twitter.com/gFfALa2iDH
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 11, 2024
दरम्यान, केएल राहुलचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. कारण केएल राहुलला कसोटी संघात स्थान मिळालं होतं. पण खास काही करता आलं नाही. इंडिया ए टीमसोबत ऑस्ट्रेलियातही त्याची कामगिरी निराशाजनक राहिली. त्यामुळे केएल राहुलवर मोठा डाव लावायचा की नाही याबाबत फ्रेंचायझी विचारात असतील. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत केएल राहुलची निवड झाली आहे. दरम्यान, या मालिकेत केएल राहुल फ्लॉप ठरला तर संघातील स्थान डळमळीत होऊ शकतं.