IPL 2025 : आयपीएल मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्समध्ये उलथापालथ! काय झालं ते जाणून घ्या
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. पुढच्या तीन वर्षांसाठी ही बांधणी होणार आहे. यासाठी प्रत्येक फ्रेंचायझीने कंबर कसली आहे. असं असताना काही दिग्गजांनी आधीच वेगळी वाट धरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मोठी उलथापालथ पाहायला मिळणार आहे.
आयपीएल 2025 स्पर्धा बऱ्याच दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. मेगा लिलावापूर्वी काही खेळाडूंना रिलीज करणं फ्रेंचायझींना भाग पडणार आहे. त्यामुळे लिलावात हवा तो खेळाडू परत घेण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागणार यात शंका नाही. त्यामुळे रोहित शर्मा असो की महेंद्रसिंह धोनी हे आपल्या फ्रेंचायझीसोबत राहतील की नाही याबाबत शंका आहे. डिसेंबरपर्यंत संघांचं चित्र स्पष्ट होईल. असं सर्व असताना दिग्गज क्रिकेटपटूही आपल्यासाठी व्यासपीठ शोधत आहेत. वेगवान गोलंदाज झहीर खान मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असं पुढे येत आहे. एका रिपोर्टनुसार, पुढच्या पर्वात झहीर खान पाचवेळा जेतेपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्सची साथ सोडणार आहे. झहीर खान गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटचा भाग आहे. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाज प्रशिक्षकानंतर डायरेक्टर ऑफ क्रिकेटची भूमिका बजावत होता. 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला प्लेयर्स डेव्हलपमेंटसाठी ग्लोबल हेड बनवलं होतं. या माध्यमातून झहीर खान मुंबई इंडियन्स फ्रेंचायसीच्या खेळाडूंना घडवण्याचं काम करत होता. गेल्या दोन वर्षांपासून झहीर खान ही भूमिका बजावत असून आता वेगळी वाट धरण्यासाठी पुढे सरसावल्याचं बोललं जात आहे.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, लखनौ सुपर जायंट्स फ्रेंचायसीने झहीर खानला मार्गदर्शकाची ऑफर दिली आहे. त्यामुळे झहीर खान या संघांची मार्गदर्शक होईल असं सांगण्यात येत आहे.कारण लखनौ सुपर जायंट्सचं हे पद गेल्या वर्षांपासून रितं आहे. मागच्या पर्वात गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सची साथ धरली. त्यामुळे झहीर खानचा या पदासाठी विचार केला जात आहे. रिपोर्टनुसार झहीर खान फक्त मेंटॉरच नाही तर संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकाची भूमिकाही बजावणार आहे. कारण लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल आता गंभीर सोबत टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये असणार आहे.
लखनौ सुपर जायंट्सने मागच्या पर्वातच कोचिंग स्टाफमध्ये बदल केला होता. गौतम गंभीर आणि अँडी फ्लॉवर यांनी साथ सोडली होती. त्यानंतर जस्टीन लँगरने संघाची धुरा सांभाळली होती. त्याच्यासोबत एडम वोग्स आणि लान्स क्लूजनर संघासोबत होते. तर जॉन्टी ऱ्होड्स आधीपासून संघाचा भाग आहे. हे सर्व पुढच्या पर्वात असतील यात शंका नाही. पण आता झहीर खान लखनौ सुपर जायंट्सची ऑफर स्वीकारतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.