ऋषभ पंतसाठी आरटीएम कार्ड का वापरलं नाही? पार्थ जिंदाल यांनी खरं काय ते सांगून टाकलं
आयपीएल मेगा लिलावात ऋषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू म्हणून विकला गेला. खरं तर त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाने रिलीज हेच मोठं आश्चर्य होतं. दुसरीकडे, आरटीएम कार्डसाठी होकारही दिला पण किंमत ऐकून माघार घेतली. असं नेमकं का घडलं? त्या मागचं कारण काय? याबाबत दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
आयपीएल 2025 मेगा लिलाव नुकताच पार पडला. या मेगा लिलावात सर्वाधिक भाव खाऊन गेला तो दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार ऋषभ पंत… लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतसाठी छप्परतोड बोली लावली आणि आपल्या संघात घेतलं. आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासातील ही सर्वात मोठी बोली ठरली आहे. लखनौ सुपर जायंट्सने त्याला आपल्या संघात घेण्यासाठी सर्वस्वी पणाला लावलं होतं. पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात बोलीसाठी चढाओढ सुरु होती. पण लखनौचा बोली लावण्याचा आक्रमकपणा पाहून पंजाब किंग्सने माघार घेतली. आता सर्व काही लखनौच्या पारड्यात जाईल असं वाटत असताना लिलावकर्त्याने दिल्ली कॅपिटल्सला आरटीएम कार्डबाबत विचारलं.त्यांनी होकारही दिला. पण लखनौने 27 कोटींची बोली लावली आणि दिल्ली कॅपिटल्सने माघार घेतली. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स आणि ऋषभ पंत यांच्यातील नातं संपुष्टात आलं आहे. गेल्या 8 पर्वात ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला. मात्र यंदाच्या पर्वात लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रेवस्पोर्ट्सशी बोलताना पार्थ जिंदाल यांनी सांगितलं की, ‘सौरव गांगुलीनंतर ऋषभ पंत हा माझा आवडता खेळाडू आहे. तो माझ्या हृदयात आहे. मी खरंच भावूक आणि दु:खी आहे. मी माझ्या आवडत्या खेळाडूला गमावलं. तो माझा आवडता खेळाडू असेल, पण मी लिलावामुळे खूप खूश आहे.’
‘आम्ही ऋषभ पंतला तेव्हाच गमवलं जेव्हा आम्ही त्याला रिटेन करू शकलो नाहीत. त्यामुळे लिलावात आम्ही त्याला घेऊ या भ्रमात राहून आम्ही आम्हाला फसवू शकत नव्हतो. जर मी त्या वेळेस राईट टू मॅच कार्ड वापरलं असतं तर मी दिल्ली कॅपिटल्सचा पुढची लिलाव प्रक्रिया खराब झाली असती. ऋषभ पंतला 18 कोटी आणि 27 कोटी यात खूप फरक आहे.’, असंही पार्थ जिंदाल यांनी पुढे सांगितलं.
पार्थ जिंदाल यांनी पंतसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी लिहिलं की, ‘ऋषभ पंत तू माझा छोटा भाऊ आहेस आणि कायम राहशील. मी मनापासून तुझ्यावर प्रेम करतो. तू खूश राहावा यासाठी मी कायम प्रयत्न केला. मी तुझ्यासोबत कुटुंबासारखा राहिलो. तुझं जाणं माझ्यासाठी वेदनादायी आहे आणि मी यासाठी भावुक आहे. तू कायम दिल्ली कॅपिटल्सचा भाग असशील आणि आशा आहे की एक दिवस पुन्हा एकत्र असू. धन्यवाद ऋषभ’