CSK vs GT Final | धोनीपुढे शहाणपण नाही! शुबमन गिल कॅप्टन कूलसमोर फेल, माहीची जडेजाला स्माईल आणि काम तमात
IPL Final 2023 CSK vs GT | चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने शुबमन गिल याचा टप्प्यात कार्यक्रम केलाय. धोनीने गिलला समजण्याआधीच स्टपिंग आऊट केलं.

अहमदाबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील महाअंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स कॅप्टन महेंद्रसिंह धोनी हा टॉसचा बॉस ठरला. धोनीने टॉस जिंकून टीम गुजरात टायटन्स संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. गुजरातकडून नेहमीप्रमाणे शुबमन गिल आणि ऋद्धीमान साहा ही सलामी जोडी मैदानात आली. या जोडीने गुजरातला झोकात सुरुवात करुन दिली. गिल गेल्या काही सामन्यांपासून मॅचविनिंग खेळी करतोय. त्यामुळे त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. त्यानुसार गिल खेळत होता. दीपक चाहरने गिलला तब्बल 2 वेळा जीवनदान दिलं. त्यामुळे चेन्नईला गिलची कॅच सोडणं महागात पडणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र मास्टरमाईंड धोनीने हुशारीने गिलचा काटा काढला.
गुजरातच्या साहा-गिल जोडीने पावरप्लेमध्ये शानदार बॅटिंग केली. या जोडीने पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये 62 धावा केल्या. तर दुसऱ्या बाजूला चेन्नई विकेटच्या शोधात होती. पावरप्ले संपल्यानंतर फिल्डिंग निर्बंध हटले. त्यामुळे कॅप्टन धोनीने रविंद्र जडेजा याला गुजरातच्या डावातील 7 वी ओव्हर टाकायला दिली.
जडेजाने चेन्नईची पहिल्या विकेटची प्रतिक्षा संपली. 7 व्या ओव्हरमधील 6 व्या बॉलवर गिल जडेजाचा बॉल मारायला थोडा पुढे आला. मात्र गिलला बॉल नीट खेळता आला नाही. त्यामुळे बॉल थेट विकेटकीपर धोनीच्या हातात गेला. धोनीने क्षणाचा विलंब न लावता गिलला स्टंपिग केलं. विशेष म्हणजे धोनीने शुबमन गिल याला अवघ्या 0.12 सेकंदात स्टंपिग आऊट केलं. शुबमन गिल याने 20 बॉलमध्ये 7 चौकारांच्या मदतीने 39 धावांची खेळी केली. गिल आऊट झाल्याने गुजरातला मोठा झटका लागला.
धोनीची हुशारी शुबमन गिल माघारी
MS Dhoni – the lightning quick behind the stumps. pic.twitter.com/KuFCHJQQDM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 29, 2023
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुधारसन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.