मुंबई: IPL 2022 मध्ये पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सवर (PBKS vs CSK) विजय मिळवला आहे. पंजाबने हा सामना 11 धावांनी जिंकला. पंजाबचा हा चौथा विजय आहे. पंजाबच्या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्सचा प्लेऑफचा (Play off) मार्ग अधिक खडतर बनला आहे. चेन्नईने आतापर्यंत फक्त दोन सामने जिंकले आहेत. पॉइंटस टेबलमध्ये ते नवव्या स्थानावर आहेत. पंजाबच्या 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने निर्धारित 20 षटकात सहा बाद 176 धावा केल्या. अंबाती रायुडूची 39 चेंडूतील 78 धावांची खेळी व्यर्थ ठरली. यात सात चौकार आणि सहा षटकार होते. पंजाबच्या विजयात दोन धवन हिरो ठरले. चेन्नईला अखेरच्या षटकात विजयासाठी 27 धावांची गरज होती. धोनी खेळपट्टीवर होता. त्यामुळे विजयाच्या आशा कायम होत्या. धोनीने सुरुवातही तशीच केली होती. ऋषी धवन शेवटची ओव्हर टाकत होता. त्याच्या पहिल्या चेंडूवर धोनीने षटकार ठोकला. त्यानंतर त्याने वाईड बॉल टाकला. पण तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात धोनी बेअरस्टोकरवी झेलबाद झाला. तिथे चेन्नईचा पराभव निश्चित झाला.
चेन्नईला या सामन्यात विजयाच्या आशा पल्लवित करता आल्या, त्या अंबाती रायुडूमुळे. रायुडूने आज खेळपट्टीवर आल्यापासून तुफान बॅटिंग केली. पंजाब किंग्सच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत त्याने तुफान फटकेबाजी केली. त्याने 39 चेंडूत 78 धावा फटकावल्या. यात सात चौकार आणि सहा षटकार होते. पण मोक्याच्याक्षणी कागिसो रबाडाच्या यॉर्करवर तो बोल्ड झाला. ती गेमचेंजिग ओव्हर ठरली. चेन्नईच्या तीन विकेट आज झटपट गेल्या. पण ऋतुराज गायकवाड आणि रायुडूने दबाव न घेता खेळ सुरु ठेवला. ऋतुराजने 30 धावांची खेळी केली. धोनीने आठ चेंडूत 12 धावा केल्या. यात एक चौकार आणि एक षटकार होता.
पहा अंबाती रायुडूची 39 चेंडूतील 78 धावांची तुफान खेळी
पहा परफेक्ट यॉर्करवर अंबाती रायुडूची गेम चेंजिंग विकेट
तत्पूर्वी शिखर धवनमुळे पंजाबला आज 187 धावांपर्यंत मजल मारता आली. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्सचा हा ओपनर आज आपल्या खऱ्या फॉर्ममध्ये दिसला. शिखर धवन म्हणजे गब्बरने आज CSK च्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. जो गोलंदाज समोर आला, त्याची धवनने धुलाई केली. शिखर धवनने आज 59 चेंडूत नाबाद 88 धावा केल्या. यात 9 चौकार आणि दोन षटकार होते.
शिखर धवनची क्लासिक इनिंग पहाण्यासाठी इथे क्लिक करा
चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात शिखरने आज 6 हजार धावा पूर्ण केल्या. विराट कोहली नंतर IPL मध्ये अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज आहे.धवनने सोमवारी सीएसके विरुद्धच्या सामन्यात 6 हजार धावांचा टप्पा गाठला. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने माहीश तीक्ष्णाच्या गोलंदाजीवर एकेरी धाव काढून सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला. शिखर धवनचं दिल्ली कॅपिटल्सकडून आय़पीएल करीयर सुरु झालं होतं. त्याने पहिल्याच सामन्यात मॅच विनिंग अर्धशतकी खेळी केली होती. 2019 ला पुन्हा तो दिल्लीच्या संघात आला. त्याआधी तो सनरायजर्स हैदराबादकडून खेळला.