मुंबई: IPL 2022 चा 15 वा सीजन नुकताच संपला असून या लीग संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुढच्या सीजनसाठी आयपीएलच्या मीडिया राइट्सचा (IPL Media Rights) लिलाव होणार आहे. 2023 ते 2028 सीजनसाठी मीडिया राइट्स दिले जाणार आहेत. मीडिया राइट्ससाठी बोलीची रक्कम 50 ते 60 हजार कोटीपर्यंत जाऊ शकते. आयपीएल मीडिया राइट्ससाठी टेंडर आधीच निघालं असून एकूण पाच कंपन्यांमध्ये चुरस आहे. यावेळी BCCI च्या तिजोरीत घसघशीत रक्कम जमा होणार आहे. याआधी सुद्धा मीडिया राइट्सचा लिलाव झालेला, तेव्हा बीसीसीआयला मोठी रक्कम मिळाली होती. यापूर्वी 2018 ते 2022 असं चार वर्षांसाठी मीडिया राइट्सचा लिलाव झाला होता. त्यावेळी बीसीसीआयला 16,300 कोटी रुपये मिळाले होते. यावेळी बीसीसीआयच्या तिजोरीत तीन ते चार पट जास्त रक्कम जमा होईल.
लिलावाबद्दलच्या काही मोठ्या गोष्टी
आयपीएल 2022 मध्ये एकूण 10 संघ होते. पुढच्या सीजनमध्येही एवढेच संघ असतील. आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ झाली आहे. 10 टीम्स झाल्यानंतर रोमांच वाढेल अशी अपेक्षा होती. पण टीव्ही रेटिंग्सच्या हिशोबाने पहिला सीजन खास राहिला नाही. टीआरपीमध्येही मोठी पडझड झाली. पुढच्या सीजनमध्ये आयपीएलच्या टीआरपीमध्ये वाढ करण्याचं बीसीसीआयचं प्रमुख लक्ष्य असेल. इंडियम प्रीमियर लीग जगातील एक यशस्वी लीग स्पर्धा आहे. जगातील नावाजलेले खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात. इथे चांगल्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडतो.