मुंबई : इंडिअन प्रीमिअर लीग ही जगभर प्रसिद्ध आहे. येत्या 31 मार्चला यंदाच्या पर्वातील पहिला सामना होणार आहे. क्रीडाप्रेमीही आयपीएलची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अशातच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा एक व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केला आहे. यामध्ये त्याला विचारण्यात येतं की, तुला आयपीएल आवडते की बिग बॅश लीग? यावर तो जे उत्तर देतो त्याचा व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केलाय. या प्रश्नाचं उत्तर देताना पाहा नेमकं काय म्हणाला बाबर?
बाबरला विचारल्यावर तो थोडासा थांबतो आणि बिग बॅश लीगचे नाव घेतो. आयपीएलपेक्षा बिग बॅश लीग जास्त आवडत असल्याचं बाबर आझमने सांगितलं. IPL ही जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत T20 लीग मानली जाते. मात्र आयपीएलमध्ये पाकिस्तान खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे.
According to Babar Azam ?
Big Bash League > IPL#PSL pic.twitter.com/RRpbH57wuE
— Cricket Pakistan (@cricketpakcompk) March 15, 2023
2008 हा एकमेव हंगाम होता ज्यामध्ये पाकिस्तान संघाचे खेळाडू आयपीएल खेळले होते. मुंबईतील ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर बंदी घालण्यात आली आहे. बिग बॅश लीगमध्ये बाबर हा सिडनी सिक्सर्सचा संघाकडून खेळतो. तर पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर झल्मी संघाचं तो नेतृत्व करत आहे. बाबर आझम मोठा खेळाडू असून तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याची सरासरी 40 च्या वर आहे.
आयपीएलची तुलना जगातील मोठ्या स्पर्धांशी केली जाते. जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आतुर असतात. आयपीएलने अनेक युवा खेळाडूंना देशाकडून खेळण्याची संधी मिळाली असून यामध्ये आताच्या भारतीय संघातील हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
दरम्यान, बाबर आझमने बिग बॅश लीग आवडत असल्याचं सांगितल्यावर नेटकऱ्यांनी त्याला फैलावर घेतलं आहे. तुम्हाला घेत नाही खेळायला म्हणून त्याने बीबीएलचं नाव घेतलं असं नेटकरी म्हणत आहेत.