IPL 2024, Orange Cap : ऑरेंज कॅपची रियान परागला संधी, पंजाबविरुद्ध इतक्या धावा केल्या की झालं
IPL 2024 Purple Cap, Most wicket taker : आयपीएल 2024 स्पर्धेतील ऑरेंज कॅपची शर्यत गेल्या काही दिवसांपासून मंदावली होती. विराट कोहलीने शतकी खेळी केल्यानंतर इतर फलंदाजांचं कठीण झालं होतं. मात्र मुंबई इंडियन्सविरुद्ध विराटचा डाव 3 धावांवर आटोपल्यानंतर ही शर्यत पुन्हा सुरु झाली आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेवर फरक दिसून येतो. गुणतालिकेत वरखाली होत असताना ऑरेंज कॅपची शर्यतही तशीच काहीशी आहे. आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. सहा पैकी पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. मात्र असं असलं तरी विराट कोहलीच्या डोक्यावर मानाची कॅप आहे. विराट कोहली मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात फेल गेला असला तरी मानाची कॅप त्याच्याकडेच आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध विराट कोहलीचा डाव 3 धावांवर आटोपला होता. मात्र दोन अर्धशतकं आणि एका शतकाच्या जोरावर त्याने मोठी धावसंख्या उभारली आहे. विराट कोहलीने सहा सामन्यात 319 धावा केल्या आहेत. त्यामुळे मानाची ऑरेंज कॅप कित्येक दिवसांपासून त्याच्या डोक्यावर आहे. आता राजस्थान रॉयल्स फलंदाज रियान पराग या शर्यतीत पुढे आला आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात 59 धावांची खेळी करताच ही मानाची कॅप त्याला मिळणार आहे.
संजू सॅमसनही या रेसमध्ये असणार आहे. संजू सॅमसनने 74 धावांची खेळी केली तर त्यालाही हा मान मिळवता येईल. रियान आणि संजू सॅमसन सध्या फॉर्मात आहेत. त्यामुळे पंजाब विरुद्धच्या सामन्यात या दोघांना संधी आहे. दुसरीकडे, टॉप 5 बाबत बोलायचं तर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शनही आहेत. विराट कोहली मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात फेल गेल्याने ऑरेंज कॅपची चुरस पुढच्या काही दिवसात आणखी चुरशीची होणार आहे. टॉप 5 मधील एखाद्या फलंदाजाने शतकी खेळी केली तरच हे गणित आणखी लांबेल.
विराट कोहली 319 धावांसह पहिल्या, रियान पराग 261 धावांसह दुसऱ्या, शुबमन गिल 255 धावांसह तिसऱ्या, संजू सॅमसन 246 धावांसह चौथ्या, साई सुदर्शन 226 धावांसह पाचव्या, हेन्रिक क्लासेन 186 धावांसह सहाव्या, निकोलस पूरन 178 धावांसह सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात धावांचा पाऊस पडताच क्रमवारीत वर खाली होणार आहे. पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. टॉप 5 मध्ये राजस्थानचे दोन खेळाडू असल्याने यात उलथापालथ होण्याची शक्यता आहे.