IPL 2024 Orange Cap: विराटच्या शतकी खेळीनंतर ऑरेंज कॅपची रेस लांबली, पाहा कोण कुठे आहे ते
आयपीएल स्पर्धेतील 19 सामने झाले असून ऑरेंज कॅपची रेस आता खूपच लांबली आहे. विराट कोहलीने राजस्थान विरुद्ध नाबाद 113 धावांची खेळी केली आणि ऑरेंज कॅप रेस आता एकतर्फी झाली आहे. आता पुढचे काही दिवस धावांमधील हे अंतर कमी करणं खूपच कठीण होईल.
आयपीएल 2024 स्पर्धेतील 19 सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात खऱ्या अर्थाने छाप पाडली ती किंग कोहली विराटने..विराट कोहलीने आयपीएलच्या 17 व्या पर्वातील पहिलं शतक ठोकलं. विराट कोहलीने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. कोहलीने 72 चेंडूत नाबाद 113 धावांची खेळी केली. यात 12 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. या खेळीमुळे ऑरेंज कॅपची रेस आता एकतर्फी झाली आहे. कारण विराट कोहलीच्या शतकी खेळीमुळे ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असलेल्या खेळाडूंना अव्वल स्थान गाठणं कठीण झालं आहे. विराट कोहीलने 5 सामन्यात 1 शतक आणि दोन अर्धशतकांच्या मदतीने 316 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या तुलनेत इतर खेळाडू खूपच मागे पडले आहेत. त्यामुळे हे अंतर गाठण्यासाठी विराट कोहली सोडून इतर फलंदाजांना शतकी खेळी करावी लागेल.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत रियान पराग हा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 4 सामन्यात दोन अर्धशतकांच्या मदतीने 185 धावा केल्या आहेत. त्यामुळे विराट कोहली आणि त्याच्यातील अंतर 131 धावांचं आहे. तिसऱ्या स्थानावर संजू सॅमसन आहे. त्याने 4 सामन्यात 178 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. चौथ्या स्थानावर हेन्रिक क्लासेन असून त्याने 4 सामन्यात 2 अर्धशतकांच्या मदतीने 177 धावा केल्या आहेत. पाचव्या स्थानावर शुबमन गिल असून त्याने 4 सामन्यात 1 अर्धशतक झळकावत 164 धावा केल्या आहेत. तर सहाव्या स्थानावर अभिषेक शर्मा आहे. त्याने 4 सामन्यात एका अर्धशतकाच्या जोरावर 161 धावा केल्या आहे.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
आयपीएलमधील 19 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने 20 षटकात 3 गडी गमवून 183 धावा केल्या आणि विजयासाठी 184 धावांचं लक्ष्य ठेवलं. हे आव्हान राजस्थान रॉयल्सने 19.1 षटकात 189 धावा केल्या आणि विजय मिळवला. संघाला विजयासाठी एक धावेची गरज असताना जोस बटलरने उत्तुंग षटकार मारला आणि शतक साजरं केलं. राजस्थान रॉयल्सचा या स्पर्धेतील सलग चौथा विजय आहे. तर बंगळुरुने पाच सामने खेळले असून चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. या विजयासह राजस्थानने 8 गुणांसह पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. तर बंगळुरुला आठव्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे.