IPL 2024 Points Table: दिल्ली कॅपिटल्सने लखनौला पराभूत केल्याने आरसीबीला फटका, तर चेन्नई सुपर किंग्सला फायदा
आयपीएल स्पर्धेत प्रत्येक सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेवर प्रभाव पडताना दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केल्याने गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. आरसीबीला फटका, तर चेन्नई सुपर किंग्सला फायदा झाला आहे.
आयपीएल स्पर्धेतील 26 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना पार पडला. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने 6 गडी राखून जिंकला. दिल्ली कॅपिटल्सचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे. या विजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पाय आणखी खोलात गेला आहे. कारण दिल्ली कॅपिटल्सच्या विजयामुळे 2 गुणांची कमाई झाली आहे. 4 गुणांसह दिल्ली कॅपिटल्सला गुणतालिकेत फायदा झाला आहे. दहाव्या स्थानावर दिल्लीने नवव्या स्थानावर झेप घेतली आहे. तर नवव्या स्थानावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची दहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. आरसीबीचे सर्वात कमी म्हणजेच 2 गुण आहेत. त्यामुळे दहाव्या स्थानावर फेकला गेला आहे. दुसरीकडे लखनौ सुपर जायंट्सच्या पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्सला फायदा झाला आहे.
लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचे समान गुण आहेत. पण दिल्ली कॅपिटल्सने लखनौला पराभूत केल्याने नेट रनरेटवर फरक पडला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स तिसऱ्या स्थानावर, तर लखनौ सुपर जायंट्सची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा 0.666 रनरेट इतका असून लखनौ सुपर जायंट्सचा 0.436 नेट रनरेट इतका आहे. राजस्थान रॉयल्स 8 गुणांसह पहिल्या स्थानावर, कोलकाता नाईट रायडर्स 6 गुण आणि 1.528 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे.
पाचव्या स्थानावर सनरायझर्स हैदराबाद आहे. हैदराबादचे 6 गुण आणि 0.344 नेट रनरेट आहे. गुजरात टायटन्सचे 6 गुण आणि -0.637 नेट रनरेट असून सहाव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स सातव्या स्थानावर असून 4 गुण आणि -0.073 नेट रनरेट आहे. पंजाब किंग्सचे 4 गुण असून -0.196 नेट रनरेट असून आठव्या स्थानावर आहे.
दरम्यान, लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. लखनौने 20 षटकात 7 गडी गमवून 167 धावा केल्या आणि विजयासाठी 168 धावा दिल्या. या धावा दिल्ली कॅपिटल्सने 6 गडी राखून जिंकला. दिल्लीकडून जेक फ्रासर मॅकगुर्क याने 35 चेंडूत 55 धावा, तर ऋषभ पंतने 24 चेंडूत 41 धावांची खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं आहे. यापूर्वी तीन वेळा लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केलं होतं.