IPL 2024 Points Table: राजस्थान रॉयल्सचा आरसीबीसह कोलकात्याला दे धक्का, गुणतालिकेत झाली अशी उलथापालथ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात स्पर्धेतील 19 वा सामना पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा 6 गडी राखून धुव्वा उडवला. खरं तर या सामन्यातील विजय बंगळुरुसाठी बुस्टर ठरला असता. पण तसं झालं नाही. त्यामुळे आता स्पर्धेतील पुढची वाटचाल आणखी कठीण होणार आहे.
आयपीएल स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसत आहे. राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 6 गडी राखून पराभव केला. या स्पर्धेतील राजस्थान रॉयल्सचा हा सलग चौथा विजय आहे. या विजयासह राजस्थान रॉयल्सने आणखी 2 गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे राजस्थानचे 8 गुण झाले असून गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा नेट रनरेट हा 1.120 इतका आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला आठव्या स्थानावरच समाधान मानावं लागलं आहे. बंगळुरुची स्पर्धेतील पुढची वाटचाल आणखी बिकट झाली आहे. बंगळुरुला साखळी फेरीत आणखी 9 सामने खेळायचे आहेत. या नऊ सामन्यात विजय मिळवला तर 18 गुण होतील आणि प्लेऑफमध्ये स्थान मिळवता येईल. पण हे समीकरणही सामन्यानुसार बदलत जाणार आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे.
गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सच्या विजयानंतर फक्त एकच उलथापालथ झाली आहे. राजस्थान 8 गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचे 6 गुण असल्याने दुसऱ्या स्थानी घसरण झाली. राजस्थानच्या तुलनेत कोलकात्याचा रनरेट चांगला आहे. कोलकात्याचे 2.518 इतका नेट रनरेट आहे. तिसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्स असून 4 पैकी 2 सामन्यात विजय मिळवून 4 गुण आणि 0.517 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानी आहे. तर लखनौ सुपर जायंट्स संघ 4 गुण आणि 0.483 नेट रनरेटसह चौथ्या स्थानी आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघ 4 गुण आणि 0.409 नेट रनरेटसह पाचव्या स्थानी आहे. पंजाब किंग्स सह 4 गुण आणि -0.220 नेट रनरेटसह सहाव्या स्थानी आहे. गुजरात टायटन्स 4 गुणांसह -0.580 नेट रनरेटसह सातव्या स्थानी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे एका विजयासह 2 गुण असून नेट रनरेट -0.843 इतका आहे. त्यामुळे आठव्या स्थानावर आहे. दिल्ली कपिटल्स संघ एका विजयासह 2 गुण आणि -1.347 नेट रनरेटसह नवव्या स्थानावर आहे. तर मुंबईच्या पदरी तीन सामन्यात निराशा पडली आहे. त्यामुळे गुण नसल्याने शेवटच्या स्थानी आहे.
दरम्यान, रविवारी दोन सामन्यांची मेजवानी आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. तर गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यातील निकालानंतर गुणतालिकेत मोठा फरक दिसून येईल.