IPL 2024, Purple Cap : पर्पल कॅपचा मानकरी कोण? जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहलच्या विकेट्स सारख्या पण…
IPL 2024 Purple Cap: आयपीएल 2024 स्पर्धेतील पर्पल कॅपची शर्यत चुरशीची झाली आहे. जसप्रीत बुमराहने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध पाच विकेट घेत यात रंगत आणली आहे. जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल यांच्यात तुल्यबळ लढाई सुरु आहे. विकेट्सच्या बाबतीत दोघंही सारखेच आहेत. मात्र बुमराह चहलपेक्षा उजवा ठरला आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2024 संघांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. आयपीएल स्पर्धेतील एकूण 26 सामने खेळले गेले आहेत. प्रत्येक सामन्यातील निकालानंतर गुणतालिकेवर प्रभाव पडत आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघांची चढाओढ सुरु झाली आहे. दुसरीकडे, गोलंदाजांमध्येही पहिल्या क्रमांकावर राहण्यासाठी चुरशीची लढाई दिसत आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला मानाची पर्पल कॅप मिळते. पण सध्याच्या स्थितीत मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र यांनी सारख्याच विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 10 गडी बाद केले आहेत. मात्र जसप्रीत बुमराह आघाडीवर आहे. कारण बुमराहचा इकोनॉमी रेट हा युझवेंद्र चहलपेक्षा चांगला आहे.
मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या जसप्रीत बुमराहने 5 सामन्यात एकूण 20 षटकं टाकत 119 धावा दिल्या. तसेच 5.95 च्या इकोनॉमी रेटने 10 विकेट्स घेतल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध 21 धावा देत पाच गडी बाद हा सर्वोत्तम स्पेल राहिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल आहे. त्याने 5 सामन्यात 7.33 च्या इकोनॉमीने 10 गडी बाद केले आहे.
पर्पल कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्सचा मुस्तफिझुर रहमान आहे. त्याने 4 सामन्यात 8 च्या इकोनॉमी रेटने 9 गडी बाद केले आहेत. चौथ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्सचा खलील अहमद आहे. त्याने 6 सामन्यात 8.79 च्या इकोनॉमी रेटने 9 गडी बाद केले आहेत. तर पाचव्या स्थानावर पंजाब किंग्सचा अर्शदीप सिंग आहे. त्याने 5 सामन्यात 8.72 च्या इकोनॉमी रेटने 8 गडी बाद केले आहेत. अर्शदीपलाही अव्वल स्थानी येण्याची संधी आहे. त्याने तीन गडी बाद करताच अव्वल स्थान गाठू शकतो.
पर्पल कॅप हा इंडियन प्रीमियर लीगच्या एका पर्वात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला दिला जाणारा पुरस्कार आहे.सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप आणि 15 लाख रुपयांसह ट्रॉफी दिली जाते.मागच्या आयपीएल पर्वात गुजरात टायटन्सच्या मोहम्मद शमीने पर्पल कॅप जिंकली होती. मात्र यंदाच्या स्पर्धेत शमी खेळत नाही. वनडे वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर शस्त्रक्रिया झाली आणि आता आराम करत आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेलाही मोहम्मद शमी मुकणार आहे.