RR vs SRH : राजस्थान रॉयल्सच्या पराभवाला जबाबदार कोण? कर्णधार रियान पराग म्हणाला…
आयपीएल 2025 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सची सुरुवात पराभवाने झाली. रियान परागने नाणेफेकीचा कौल जिंकला. पण प्रत्येक षटकानंतर सामना गमवण्याचा भास होत होता. अखेर रियान परागने पराभवानंतर आपलं दु:ख व्यक्त केलं आणि पराभवाचं खापर तीन जणांवर फोडलं.

आयपीएल 2025 स्पर्धेत चौकार आणि षटकारांचं दर्शन घडवणारा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. एक तर नाणेफेक गमावल्यानंतरही वाटेला पहिली फलंदाजी आली. त्यात दिग्गज फलंदाजांचा भरणा असल्याने 200 पार धावा सहज होतील असं गृहीत धरलं होतं. झालंही तसंच..हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमवून 286 धावा केल्या. यात इशान किशनने सर्वाधिक नाबाद 106 धावांची खेळी केली. विजयासाठी मिळालेल्या 286 धावांचा पाठलाग करताना फलंदाजांनी चांगला प्रयत्न केला. 242 धावांपर्यंत मजल मारली. पण 44 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पराभवानंतर राजस्थानचा कर्णधार रियान परागने मोठं विधान केलं आहे. तसेच पराभवासाठी गोलंदाजांना जबाबदार धरलं आहे.
रियान पराग आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवत आहे. रियान पराग म्हणाला की, ‘माझ्या अपेक्षेप्रमाणे ते कठीण होते. हैदराबादला श्रेय जातं. पण आम्ही आणखी चांगले करू शकलो असतो. आपण बसून कसे चांगले प्रदर्शन करता येईल यावर चर्चा करू. मला वाटतं संपूर्ण संघाने मिळून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तो योग्य निर्णय होता. आम्ही गोलंदाजीत इथेही नव्हतो आणि तिथेही नव्हतो, आम्ही आणखी चांगले करू शकलो असतो.’ रियान परागने अप्रत्यक्षरित्या या पराभवाचं खापर तीन गोलंदाजांवर फोडलं आहे. यात फरलहक फारुखी, महीश तीक्षणा आणि जोफ्रा आर्चर आहेत. जोफ्रा आर्चरने 4 षटकात 76 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. तर तीक्षणाने 52 आणि फारुखीने 49 धावा दिल्या.
दुसरीकडे हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, ‘मला आमच्या मुलांना गोलंदाजी करायची इच्छा होणार नाही. अविश्वसनीय. ते भयानक होते. तुम्हाला माहिती आहेच की गोलंदाजांसाठी कठीण असणार आहे. पण जेव्हा तुम्ही एवढी मोठी धावसंख्या मिळवता तेव्हा एक षटक तुम्हाला जिंकून देऊ शकते. आम्ही संघाला एकत्र ठेवण्यात यशस्वी झालो आहोत. आज इशान अविश्वसनीय होता. फक्त मोकळ्या मनाने खेळण्याचा प्रयत्न करत आहे. तयारी अद्भुत आहे, आमचे प्रशिक्षक अद्भुत आहेत. मुलांनी उर्वरित वर्ष कसे खेळायचे याचा एक आराखडा तयार केला.’