क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, स्पॉट फिक्सिंगमधील ‘त्या’ खेळाडूबाबत बीसीसीयकडून महत्त्वाचा निर्णय
बीसीसीआय लोकपालने आजीवन बंदी असलेल्या खेळाडूची बंदी सात वर्षांची केली आहे. 2013 साली आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरण समोर आलं होतं.
मुंबई : आयपीएलच्या 16 व्या हंगामाचं बिगुल वाजलं असून येत्या 31 मार्चला पहिला सामना होणार आहे. अशातच बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. स्पॉट फिंक्सिंगमधील आजीवन बंदी घालण्यात आलेल्या खेळाडूवरची बंदी उठवली आहे. बीसीसीआय लोकपालने आजीवन बंदी असलेल्या खेळाडूची बंदी सात वर्षांची केली आहे. 2013 साली आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरण समोर आलं होतं. आयपीएलच्या सहाव्या मोसमाला स्पॉट फिक्सिंगमुळे डाग लागला होता.
आजीवन बंदी उठवण्यात आलेला खेळाडू दुसरा तिसर कोणी नसून अजित चंडिला आहे. 2013 मध्ये आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघामधील तीन खेळाडू स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सापडले होते. अंकीत चव्हाण, एस श्रीशांत आणि अजित चंडिला अशी तीन खेळाडूंची नावं आहेत.
बीसीसीआयचे लोकपाल विनीत सरन यांनी शिक्षा कमी करण्याचा निर्णय घेतल्याने अजित चंडिलावरील बंदी 18 जानेवारी रोजी संपली आणि आता ते पुनरागमन करण्यास तयार आहेत. 2017 मध्ये, केरळ उच्च न्यायालयाने 2013 च्या आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणानंतर बीसीसीआयने श्रीशांतवरील लादलेली आजीवन बंदी रद्द केली होती.
दरम्यान, 2017 मध्ये, केरळ उच्च न्यायालयाने श्रीशांतवरील बंदी उठवली होत त्यानंतर तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानात दिसला होता. श्रीशांत त्याच्या घरच्या टीमकडून खेळताना दिसला होता. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने कर्नाटक संघाचं प्रतिनिधित्त्व केलं होतं. अंकित चव्हाणवरीलही बंदी काढण्यात आल्यावर तो मुंबईतील आपल्या क्लबकडून खेळताना दिसला. मात्र अंकितचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याचं स्वप्न अधुर राहिलं. अजित चंडिला जुन्या सहकाऱ्यांप्रमाणे मैदानावर परतणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.