Irani Trophy 2024: संजू सॅमसनकडे पुन्हा दुर्लक्ष, शतकी खेळीनंतरही संधी नाहीच

| Updated on: Sep 25, 2024 | 12:46 AM

Sanju Samson Exluded In Irani Cup 2024: संजू सॅमसनने नुकत्याच पार पडलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील 4 डावांमध्ये 1 शतकासह 190 धावा केल्या. त्यानंतरही संजूला इराणी ट्रॉफीत संधी मिळाली नाही.

Irani Trophy 2024: संजू सॅमसनकडे पुन्हा दुर्लक्ष, शतकी खेळीनंतरही संधी नाहीच
sanju samson
Follow us on

अवघ्या काही तासांपूर्वी दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेची सांगता झाली. मयंक अग्रवालच्या नेतृत्वात इंडिया ए ने दुलीप ट्रॉफी स्पर्धेवर नाव कोरलं. तर ऋतुराज गायकवाड याची इंडिया सी टीम उपविजेती ठरली. त्यानंतर आता बीसीसीआयच्या देशांतर्गत क्रिकेट हंगामातील दुसरी स्पर्धेला अवघ्या काही दिवसांनी सुरुवात होणार आहे. इराणी ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलं आहे. या स्पर्धेतील रेस्ट ऑफ इंडिया आणि मुंबई या दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. अजिंक्य रहाणे मुंबईचा कॅप्टन आहे. तर ऋतुराज गायकवाड रेस्ट ऑफ इंडिया टीमची कॅप्टन्सी करणार आहे. या स्पर्धेनिमित्ताने पुन्हा एकदा संजू सॅमसनकडे दुर्लक्ष झाल्याचं स्पष्ट झालं आहे. संजूने दुलीप ट्रॉफी स्पर्धेत शतकी खेळी केली होती. त्यानंतरही संजूचा समावेश न केल्याने निवड समिती त्याच्याकडे ठरवून दुर्लक्ष करतेय का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय.

बीसीसीआयने इराणी ट्रॉफी स्पर्धेसाठी रेस्ट ऑफ इंडिया संघ जाहीर केला. त्या संघात साई सुदर्शन, देवदत्त पडीक्कल, ध्रुव जुरेल, ईशान किशन, मानव सुथार, सारांश जैन, प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद आणि राहुल चहर यांना संधी संधी दिली आहे. बांगलादेश विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत निवड होऊनही यश आणि ध्रुव या दोघांना संधी मिळाली आहे.

शतकी खेळीनंतरही स्थान नाही

संजू सॅमसन याने दुलीप ट्रॉफी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. संजूने दुलीप ट्रॉफी स्पर्धेत इंडिया डी संघाचं प्रतिनिधित्व केलं. संजूने या स्पर्धेतील 4 डावांमध्ये 1 शतक आणि 2 वेळा 40 पेक्षा अधिक धावा केल्या. संजूने एकूण 196 धावा केल्या. मात्र त्यानंतरही संजूची इराणी ट्रॉफी स्पर्धेत निवड केली गेली नाही.

इराणी कप स्पर्धेसाठी मुंबई टीम : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), सिद्धांत अद्धतराव, शम्स मुलानी, तनुश कोटीयन, हिमांशु सिंह, शार्दुल ठाकुर, मोहित अवस्थी आणि मोहम्मद जुनेद खान.

इराणी कप स्पर्धेसाठी रेस्ट ऑफ इंडिया टीम : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), अभिमन्यू इश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, देवदत्त पडीक्कल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर)*, इशान किशन (विकेटकीपर), मानव सुथार, सरांश जैन, प्रसीध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल *, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद आणि राहुल चहर.