Irani Cup : ईशान किशनने मुंबई विरुद्ध मोठी संधी गमावली, नक्की काय झालं?
Mumbai vs Rest of India : ईशान किशन गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. ईशान किशन सध्या इराणी ट्रॉफीत रेस्ट ऑफ इंडियाकडून खेळतोय. ईशानने या सामन्यात मोठी संधी गमावली.
मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात लखनऊ येथे इराणी कप स्पर्धेतील सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात मुंबईच्या सर्फराज खान याने द्विशतकी खेळी केली. तर रेस्ट ऑफ इंडियाकडून अभिमन्यू इश्वरन याने नाबाद 151 धावा केल्या आहेत. एका बाजूला या दोघांनी शानदार खेळी करुन न्यूझीलंड विरूद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेसाठी दावा ठोकला आहे. तर दुसऱ्या बाजूला फलंदाज ईशान किशन याने मोठी संधी गमावली. इशान किशन 38 धावा करुन बाद झाला. ईशानने मैदानात घट्ट पाय रोवले होते. ईशानला मोठी खेळी करण्याची संधी होती. ईशानला अपेक्षित सुरुवातही मिळाली होती. मात्र ईशानला या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपातंर करता आलं नाही. ईशान 60 व्या बॉलवर विकेटकीपर मोहित अवस्थी याच्या हाती कॅच आऊट झाला.
ईशान किशनचं आऊट होणं हे त्याच्यासाठी मोठा झटका आहे. ईशानची आधीच बांगलादेश विरूद्धच्या टी 20I सीरिजसाठी निवड करण्यात आलेली नाही. त्यात आता ईशान इथे इराणी कपमध्ये मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. ईशानने शतकी खेळी केली असती, तर त्याला न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेसाठी दावा करता आला असता. मात्र तसं काही झालं नाही. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 16 ऑक्टोबरपासून कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी पुढील काही दिवसात भारतीय संघाची घोषणा होणार आहे.
दरम्यान रेस्ट ऑफ इंडिया तिसऱ्या दिवसअखेर 248 धावांनी पिछाडीवर आहे. रेस्ट ऑफ इंडियाने मुंबईच्या 537 धावांच्या प्रत्युत्तरात 74 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 289 धावा केल्या आहेत. रेस्ट ऑफ इंडियाकडून अभिमन्यू इश्वरन याने सर्वाधिक नाबाद 151 धावा केल्या आहेत. ध्रुव जुरेल 30 धावांवर नाबाद आहे. तर त्याआधी मुंबईने सर्फराज खान याच्या नाबाद 222 धावांच्या जोरावर 537 पर्यंत मजल मारली.
मुंबई प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सर्फराज खान, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी आणि एम जुनेद खान.
रेस्ट ऑफ इंडिया प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, ईशान किशन, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, सरांश जैन, यश दयाल, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार.