Irani Cup : अभिमन्यू इश्वरनची एकाकी झुंज, मुंबई विरुद्ध तिसऱ्या दिवशी 248 धावांनी पिछाडीवर
Irani Cup Mumbai vs Rest of India Day 3 Stumps Highlights In Marathi: इराणी ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यात रेस्ट ऑफ इंडियाने मुंबईच्या 537 च्या प्रत्युत्तरात तिसऱ्या दिवसापर्यंत 289 धावा केल्या आहेत.
इराणी कप स्पर्धेतील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. रेस्ट ऑफ इंडियाने मुंबईच्या 537 च्या प्रत्युत्तरात खेळ संपेपर्यंत 4 विकेट्स गमावून 289 धावा केल्या आहेत. त्यानंतरही रेस्ट ऑफ इंडिया 248 धावांनी पिछाडीवर आहे. रेस्ट ऑफ इंडियाकडून अभिमन्यू इश्वरन याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं.तर इतर फलंदाजांना त्यांच्या लौकीकाला साजेशी खेळी करण्यापासून मुंबईकर गोलंदाजांनी रोखलं. कॅप्टन ऋतुराज याला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर इतर तिघांना आश्वास सुरुवात मिळाली, मात्र त्यांना टिकून खेळता आलं नाही. मात्र अभिमन्यू ईश्वरन याने केलेल्या नाबाद 151 धावांमुळे रेस्ट ऑफ इंडियाला 250 पार मजल मारता आली.
ऋतुराज गायकवाड याने 27 बॉलमध्ये 9 रन्स केल्या. तर साई सुदर्शन याने 32 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. देवदत्त पडीक्कल याने 16 तर ईशान किशन याने 38 धावा केल्या. त्यामुळे रेस्ट ऑफ इंडियाची स्थिती 4 बाद 228 अशी झाली. मात्र त्यानंतर अभिमन्यू ईश्वरन आणि ध्रुव जुरेल या दोघांनी टिच्चून मारा करत एकही विकेट गमावली नाही. इश्वरन आणि जुरेल या दोघांनी खेळसंपेपर्यंत पाचव्या विकेटसाठी 61 धावांची नाबाद भागीदारी केली आहे. इश्वरन 212 बॉलमध्ये 12 चौकार आणि 1 सिक्ससह 151 वर नॉट आऊट आहे. तर ध्रुवने 41 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 30 धावा केल्या आहेत. मुंबईकडून मोहित अवस्थी याने 2 विकेट्स घेतल्या. तर एम खान आणि तनुष कोटीयन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
तिसऱ्या दिवसाचा गेम ओव्हर
Another action-packed day!
Rest of India move to 289/4 on the back of a splendid 151* from Abhimanyu Easwaran.
They trail by 248 runs with Easwaran & Dhruv Jurel (30*) at the crease.#IraniCup | @IDFCFIRSTBank
Follow the match ▶️ https://t.co/Er0EHGOZKh pic.twitter.com/bReWj4aeaH
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 3, 2024
मुंबईच्या पहिल्या डावात 537 धावा
त्याआधी मुंबईचा पहिला डाव हा तिसऱ्या दिवशी 141 षटकांमध्ये 537 धावांवर आटोपला. मुंबईकडून सर्फराज खान याने सर्वाधिक विक्रमी धावांचं योगदान दिलं. सर्फराजने नाबाद द्विशतकी खेळी केली. सर्फराज इराणी कपमध्ये मुंबईकडून द्विशतक करणारा पहिला फलंदाज ठरला. सर्फराजने 286 चेंडूमध्ये 25 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 222 धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे 3 धावांनी दुर्देवी ठरला. रहाणे 97 धावांवर बाद झाला. तनुष कोटीयन आणि श्रेयस अय्यर या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. दोघांनी अनुक्रमे 64 आणि 57 धावा केल्या. तर शार्दूल ठाकुरने 36 धावांची भर घातली. डेब्यूटंट आयुष म्हात्रे याने 19 धावा जोडल्या. पृथ्वी शॉ आणि शम्स मुलानी या दोघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर हार्दिक तामोरे आणि एम खान हे दोघे झिरोवर आऊट झाले. रेस्ट ऑफ इंडियाकडून मुकेश कुमार याने 5 विकेट्स घेतल्या. यश दयाल आणि प्रसिध कृष्णा या दोघांनी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर सारांश जैन याला 1 विकेट मिळाली.
मुंबई प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सरफराज खान, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी आणि एम जुनेद खान.
रेस्ट ऑफ इंडिया प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, इशान किशन, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, सरांश जैन, यश दयाल, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार.