IRE vs IND 1ST T20I | बॅरी मॅककार्थी याचा झंझावात, टीम इंडियाला 140 धावांचं आव्हान
Barry Mccarthy | आयर्लंड क्रिकेट टीमचा बॅरी मॅककार्थी याने टीम इंडिया विरुद्ध सामन्यातील शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकत अर्धशतक ठोकलं.
डब्लिन | बॅरी मॅककार्थी याच्या झंझावाती खेळीच्या जोरावर आयर्लंड क्रिकेट टीमने टीम इंडियाला विजयासाठी 140 धावांचं आव्हान दिलं आहे. आयर्लंडने 7 विकेट्स गमावून 139 धावा केल्या. टीम इंडियाने आयर्लंडला झटपट धक्के देत बॅक फुटवर ढकललं. त्यामुळे आयर्लंड 100 धावांच्या आतच ऑलआऊट होणार असल्याचं चित्र होतं. मात्र तसं झालं नाही. सुरुवातीला फटाफट विकेट घेतल्यानंतर आयर्लंडच्या फलंदाजांनी टीम इंडियच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
आयर्लंडची 10.3 ओव्हरमध्ये 6 बाद 59 अशी स्थिती झाली होती. बॅकफुटवर गेलेल्या आयर्लंडने मॅच इथून फिरवली आणि सामन्यात कमबॅक केलं. आयर्लंडच्या शेवटच्या काही खेळाडूंनी भारतीय गोलंदाजांना चांगला चोपला. टॉप आणि मिडल ऑर्डरने निराशा केल्यानंतर आयर्लंडची शेपटीने वळवळ केली.
कर्टिस कॅम्फर याने 33 बॉलमध्ये 39 धावा केल्या. मार्क अडायर याने 16 धावा जोडल्या. जॉर्ज डॉकरेल 1 रन करुन तंबूत परतला. तर बॅरी मॅककार्थी याने एकट्याने खिंड लढवली. अर्शदीप सिंह याने 20 व्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा लुटवल्या. बॅरीने या शेवटच्या ओव्हरमध्ये 2 सिक्स ठोकले. बॅरीने 20 ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर जो फ्री हिट होता, त्यावर सिक्स ठोकून अर्धशतक पूर्ण केलं.
बॅरी मॅककार्थी याचं अर्धशतक
Now THAT is how you end an innings and bring up your maiden T20I half century.
Well done Barry McCarthy.
SCORE: https://t.co/ryMh1qvUER#IREvIND #BackingGreen ☘️@JoyEbike pic.twitter.com/Q801GabgEa
— Cricket Ireland (@cricketireland) August 18, 2023
बॅरीने 33 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 4 फोरच्या मदतीने नाबाद 51 धावांची खेळी केली. कॅप्टन पॉर्ल स्टर्लिंग याने 11 धावा केल्या. एकाला भोपळा फोडता आला नाही. तर तिघांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. तर क्रेग यंग 1 धावेवर नाबाद परतला. टीम इंडियाकडून कॅप्टन जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि शिवम दुबे या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर अर्शदीप सिंह याच्या खात्यात 1 विकेट गेली.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | जसप्रीत बुमराह (कॅप्टन) ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई.
आयर्लंड प्लेईंग इलेव्हन | पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.