मुलगा समितला कोचिंग करणं सोपं की इंडियन टीमला? रैनाने प्रश्न विचारताच राहुल द्रविडने दिलं असं उत्तर

| Updated on: Jan 12, 2024 | 6:34 PM

भारत अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. टी20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया आपली बाजू भक्कम करण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे प्रशिक्षक राहुल द्रविड यानेही आतापर्यंत घडलेल्या सर्व घडामोडींचा लेखाजोखा मांडला. तसेच मुलगा समितबाबतही सांगितलं.

मुलगा समितला कोचिंग करणं सोपं की इंडियन टीमला?  रैनाने प्रश्न विचारताच राहुल द्रविडने दिलं असं उत्तर
समितला कोचिंग देणं किती सोपं आहे? रैनाच्या प्रश्नावर राहुल द्रविडने स्पष्टच सांगितलं की..
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पराभव कोणीही विसरू शकत नाही. भारताच्या हातातोंडाशी आलेला घास शेवटच्या क्षणी ऑस्ट्रेलियाने हिरावून नेला. त्यामुळे टीम इंडियामध्ये निराशेचं वातावरण होतं. त्यानंतर आता टीम इंडिया ट्रॅकवर येऊ लागली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं 14 महिन्यानंतर टीम इंडियामध्ये कमबॅक झालं आहे. रोहित शर्माकडे टीम इंडियाचं कर्णधारपद असून टी20 वर्ल्डकप 2024 साठी पहिली पसंती असणार आहे. त्यामुळे पाच महिन्यांच्या कालावधीत टीम इंडियाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. प्रशिक्षक राहुल द्रविडने टी20 वर्ल्डकपसाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवत पुढे जात असल्याचं सांगितलं. राहुल द्रविडचा नुकताच वाढदिवस पार पडला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी सुरेश रैना, प्रज्ञान ओझा यांच्याशी संवाद साधला. तेव्हा त्याने टीम इंडियाच्या खेळाडूंच्या मनातील भावना व्यक्त केला. उपस्थितांनी वनडे वर्ल्डकपनंतरचा वातावरण आणि आता पुढच्या तयारीबाबत विचारलं. त्यावर प्रशिक्षक राहुल द्रविडने दिलखुलासपणे उत्तर दिलं.

“क्रिकेटपटूंना एक सवय असते. जेव्हा आपण लहानपणापासून क्रिकेट खेळतो तेव्हा आपल्याला माहिती असतं चांगले वाईट दिवस येतात. पण पुढे जाणं गरजेचं आहे. पुढच्या सामन्याबाबत विचार करावा लागतो. त्यामुळे पहिल्या इनिंगबाबत रडत राहणं योग्य नाही. नक्कीच पराभवानंतर निराशा येते. पण आम्ही आता त्यातून बाहेर पडलो आहोत आणि पुढच्या प्रवासाची तयारी करत आहोत. आता टीम इंडियातील खेळाडू टी20 वर्ल्डकप 2024 बाबत विचार करत आहेत. इंग्लंडची सीरिजपण येणार आहे. पण नैराश्य येत यात काही दुमत नाही. पण आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो हे देखील तितकंच खरं आहे. आता आमच्यासमोर आणखी एक संधी आहे. नक्कीच टी20 वर्ल्डकप 2024 जिंकण्याचा प्रयत्न करू.”, असं राहुल द्रविडने सांगितलं.

प्रश्नाचं उत्तर संपताच सुरेश रैना पुढे आला आणि समितबाबत प्रश्न विचारला. इंडियन टीमला कोचिंग करणं सोपं आहे की समितला असा प्रश्न विचारला. त्यावर राहुल द्रविडने उत्तर दिलं की, “समितला मी कोचिंग करण्याचा प्रयत्नच करत नाही. ते मी सोडून दिलं आहे. पॅरंटल कोच बनणं खूपच कठीण आहे. वडिलांची भूमिका बजावत आहे. पण त्यातही मी काय करत आहे कळत नाही.”

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा सामना 14 जानेवारीला होणार आहे. मध्य प्रदेशातील होलकर मैदानात हा सामना पार पडणार आहे. या सामन्यातून विराट कोहली टी20 संघात कमबॅक करणार आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे.