IND vs AUS : इशान किशनने सांगितलं आक्रमक खेळीचं रहस्य, वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान केला असा सराव
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत इशान किशनला खेळण्याची हवी तशी संधी मिळाली नाही. पण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात आक्रमक खेळी केली. 58 धावा ठोकत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इशान किशनचं हे पहिलं अर्धशतक आहे. या आक्रमक खेळीचं रहस्य त्याने उलगडलं आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. टीम इंडियाने पहिला सामना दोन गडी राखून जिंकला. या सामन्यात इशान किशन आणि सूर्यकुमार यादवने आक्रमक खेळी करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटला ढकललं. इशान किशनने 39 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इशान किशनचं हे पहिलं अर्धशतक होतं. इतकंच काय तर 16 डावानंतर इशान किशनला अर्धशतकी खेळी करण्यात यश आलं आहे. त्यामुळे इशान किशनच्या आक्रमक खेळीचं विश्लेषण केलं जात आहे. या आक्रमक खेळीचं कनेक्शन वर्ल्डकप स्पर्धेशी जोडलं जात आहे. आता खुद्द इशान किशनने या खेळीमागचं रहस्य उघड केलं आहे.
“वनडे वर्ल्डकपमध्ये प्लेइंग इलेव्हन नव्हतो तेव्हा मी सराव करताना कायम हाच विचार करायचो की माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे. मी काय करू शकतो. मी नेटमध्ये खूप अभ्यास केला. तसेच कायम माझ्या खेळाबाबत प्रशिक्षकांसोबत चर्चा करायतचो. माझी खेळी आणखी चांगली कशी होईल. तसेच गोलंदाजांना कसं टार्गेट करावं याचा अंदाज घेत होतो.” असं इशान किशनने सांगितलं.
“आम्ही दोन विकेट लवकर गमवल्याने विजयासाठी भागीदारी महत्त्वाची होती. मी आयपीएलमध्ये सूर्यासोबत एकाच संघात खेळलो होतो. त्यामुळे मला माहिती आहे तो कसा खेळतो ते आणि कोणते शॉट्स मारतो. आम्ही दोघंही पार्टनरशिपबाबत चर्चा करत होतो. तसेच गोलंदाजांना टार्गेट करायचं आहे आणि स्ट्राइक रोटेट करत राहायचं.” असंही इशान किशन पुढे म्हणाला.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास आणणं खूप गरजेचं आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने भविष्याची वाटचाल काय आहे ते दाखवून दिलं आहे. सूर्यकुमार यादवने 80 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर रिंकून सिंहने नाबाद 22 धावा करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. टीम इंडियाचा पुढचा सामना 26 नोव्हेंबर होणार आहे. या सामन्यातील खेळीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.