इशान किशन गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचं दार ठोठावत आहे. दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडून आल्यानंतर त्याचे तारे फिरले आहेत. इतकंच काय तर बीसीसीआयने त्याला केंद्रीय करारातूनही दूर केलं होतं. तसेच बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची ताकीद दिली होती. मात्र त्याकडे कानाडोळा केल्याचा फटका भसला. उपरती झाल्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपलं नशिब आजमवण्यास सुरुवात केली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या फलंदाजीची जादू दिसली. इशान किशन बुची बाबू स्पर्धेत झारखंडकडूनस दुलीप ट्रॉफी स्पर्धेत इंडिया सीकडून आणि इराणी ट्रॉफी स्पर्धेत रेस्ट ऑफ इंडियाकडून खेळला आहे. मात्र टीम इंडियात अजूनही त्याला स्थान मिळालेलं नाही. असं असताना इशान किशनला एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी रणजी ट्रॉफी 2024-25 स्पर्धेसाठी त्याच्या खांद्यावर झारखंड संघाची धुरा सोपण्यात आली आहे. रणजी स्पर्धेत झारखंडचा पहिला सामना आसामशी होणार आहे.
आता रणजी ट्रॉफी स्पर्धेत इशान किशनची कामगिरी कशी असेल याकडे लक्ष लागून आहे. इशान किशनला कसोटी संघात स्थान मिळणं कठीण आहे. त्यामुळे त्याला वनडे आणि टी20 संघात स्थान मिळवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेपर्यंत एकही वनडे मालिका होणार नाही. त्यामुळे या संघात पुनरागमन करणं कठीण आहे. तसेच टी20 संघात आता तगडी स्पर्धा आहे. एकापेक्षा एक वरचढ फलंदाज आहेत. त्यामुळे इशान किशनला काय ते आपल्या फलंदाजीने सिद्ध करावं लागणार आहे. एकदा का संघात स्थान मिळालं की फॉर्मवरच पुढचं गणित ठरणार हे निश्चित आहे. दरम्यान, आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. मुंबई इंडियन्स इशानला रिलीज करणार यात शंका नाही. पण त्याच्यासाठी किती बोली लागते हा देखील चर्चेचा विषय ठरणार आहे.
रणजी ट्रॉफीसाठी झारखंडचा संघ : इशान किशन (कर्णधार), विराट सिंह (उपकर्णधार), कुमार कुशाग्र (विकेटकीपर), नाजिम सिद्दीकी, आर्यमन सेन, शरणदीप सिंह, कुमार सूरज, अनुकूल रॉय, उत्कर्ष सिंह, सुप्रियो चक्रवर्ती, सौरभ शेखर, विकास कुमार, विवेकानंद तिवारी, मनीषी, रवि कुमार यादव, रौनक कुमार.