Hardik Pandya : “मला काहीच फरक पडत नाही”, ‘त्या’ प्रश्नावर हार्दिक पांड्याने दिलं थेट रावडी भाषेत उत्तर
हार्दिक पांड्या वनडे वर्ल्डकप 2023 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आता आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून कॅप्टन्सी, रणजी ट्रॉफी आणि बीसीसीआय काँट्रॅक्ट या चर्चांना उधाण आलं होतं. असं असताना हार्दिक पांड्याने त्यावर रावडी भाषेत उत्तर दिलं आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाली. तेव्हापासून हार्दिक पांड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आता आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद आहे. पाचवेळा जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून त्याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स कशी कामगिरी करते याकडे लक्ष लागून आहे. तत्पूर्वी अनेक वादांना तोंड फुटलं होतं. पण हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून गप्पच होता. डीवाय पाटील टी20 क्रिकेट खेळत आहे. या दरम्यान हार्दिक पांड्याने वैयक्तिक आयुष्याविषयी खुलासा केला आहे. “माझ्या चाहत्यांना माझ्याबाबत एक गोष्ट माहिती नसल्याचं त्याने सांगितलं आहे. ती म्हणजे मी जास्त बाहेर जात नाही.”, असं हार्दिक पांड्याने सांगितलं.
“मी गेल्या तीन चार वर्षात फार कमी वेळा बाहेर पडलो. खूपच गरज असेल तरच बाहेर पडतो. मला घरीच राहायला आवडतं. मी 50 दिवस घराबाहेर पडलो नाही. घराची लिफ्टही पाहिली नाही. माझ्याकडे माझी होम जिम आणि होम थिएटर आहे. मला आवडत असलेल्या गोष्टी घरात आहेत.”, असं हार्दिक पांड्या यूके 07 रायडरसोबत चॅट शोमध्ये म्हणाला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सुपर कारमधील त्याच्या एका फोटोबद्दल या चॅट शोमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्याने सांगितलं की, कोणीतरी टेस्ट ड्राइव्हसाठी कार पाठवली आहे. “मी मीडियामध्ये टिप्पणी करत नाही, मी ते कधीही केले नाही, याचा मला काहीच फरक पडत नाही,” असं हार्दिक पांड्या म्हणाला.
बीसीसीआयने नुकतीच सेंट्रल काँट्रॅक्ट यादी जाहीर केली आहे. यात हार्दिक पांड्या ए श्रेणीत कायम असून त्याला वार्षिक पाच कोटी मिळणार आहेत. असं असताना गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपासून दूर असूनही त्याचा सेंट्रल काँट्रॅक्टमध्ये समावेश कसा केला असा प्रश्नही उपस्थित होत आहे.