Video : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पराभव पचवणं सोपं नव्हतं, कर्णधार रोहित शर्माने 23 दिवसानंतर केलं मन मोकळं
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवला 24 दिवस उलटून गेले आहेत. इतक्या दिवसानंतर कर्णधार रोहित शर्मा याने मन मोकळं केलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत त्याने याबाबत सर्वकाही सांगून टाकलं आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला. त्यामुळे दहा वर्षानंतर आयसीसी चषक जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना अश्रू अनावर झाले. या घटनेला आता 24 दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. भारतीय संघ पुन्हा एकदा नव्या जोमाने पुढच्या तयारीसाठी लागला आहे. जून 2024 मध्ये टी20 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी आतापासून तयारी केली जात आहे. ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण अफ्रिका दौऱ्यात खेळाडूंची चाचपणी केली जात आहे. पण रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी20 मालिकेपासून स्वत:ला दूर ठेवलं आहे. तर दक्षिण अफ्रिकेत दोन दिवसांच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसतील. असं सर्व चित्र असताना कर्णधार रोहित शर्मा याने बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत भावनांना मोकळी वाट करून दिली.
काय म्हणाला रोहित शर्मा?
“मला या पराभवातून कसं सावरायचं ते कळत नव्हतं. पहिले काही दिवस मी पूर्णपणे अस्वस्थ होतो. माझे कुटुंब, मित्र मला सावरण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत होते. मला सावरण्यासाठी जे काही शक्य आहे ते करत होते. त्यामुळे यातून बाहेर निघण्यास मदत झाली. खरं तर हे पचवणं खूपच कठीण आहे. पण जीवनात पुढे जाणंही गरजेचं आहे. पण खरं सांगायचं तर ते खूपच कठीण होतं. पुढे जाणं वाटतं तितकं सोपं नव्हतं.”, असं कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.
View this post on Instagram
“मी 50 षटकांचा वर्ल्डकप स्पर्धा पाहात लहानाचा मोठा झालो. मला त्याचं असं बक्षीस मिळालं. वर्ल्डकपसाठी आम्ही इतकी वर्षे काम केलं होतं. शेवटी पदरी निराशा आली. तुम्हाला हवं ते मिळालं नाही की निराशा पदरी पडते.”, असंही रोहित शर्मा पुढे म्हणाला.
“जर मला कोणी विचारलं की काय चूक झाली. आम्ही दहा सामने जिंकलो. त्या दहा सामन्यात आमच्याकडून चुका झाल्या. प्रत्येक सामन्यात तुमच्याकडून चूक होत असते. तुमच्याकडे परिपूर्ण खेळ असूच शकत नाही. ” असंही रोहित शर्मा पुढे म्हणाला. “दुसरी बाजू सांगायची तर मला माझ्या संघाचा अभिमान आहे. आम्ही जे काही खेळलो ते जबरदस्त होतं. प्रत्येक वर्ल्डकपमध्ये अशी कामगिरी करता येत नाही. फायनलपर्यंत आम्ही चांगलं खेळलो. त्याचा मला अभिमान वाटतो.”, असं रोहित शर्माने पुढे सांगितलं.