जसप्रीत बुमराहला पुन्हा तसंच काही झालं नाही ना..! त्या कृतीमुळे क्रीडाप्रेमींचं टेन्शन वाढलं
जसप्रीत बुमराह हा भारताच्या गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र आहे. त्याची गोलंदाजी पाहता बीसीसीआय त्याची विशेष काळजी घेते. देशांतर्गत क्रिकेट खेळण्यापासूनही त्याला सूट दिली आहे. असं असताना बुमराहने दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला टेन्शन दिलं आहे.
भारतीय क्रिकेटची चर्चा जसप्रीत बुमराहशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. बऱ्याच कालावधीनंतर भारताला गोलंदाजीत चांगला खेळाडू मिळाला आहे. बुमराह सामन्यात एकहाती विजय मिळवून देण्याची ताकद ठेवतो. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने नेतृत्वही केलं आणि 8 गडी बाद केले आणि विजय मिळवून दिला. दुसऱ्या कसोटी सामन्यातही जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा कहर दिसला. भारताला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर त्याच्या गोलंदाजीचा सामना करताना ऑस्ट्रेलियाचे फलंदाज चाचपडताना दिसले. पण आता जसप्रीत बुमराहबाबत भारतीय संघाला वेगळंच टेन्शन आलं आहे. कारण षटक टाकताना दुखापतग्रस्त झाला. एकीकडे ट्रेव्हिस हेडने भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. अशा वेळी रोहित शर्माने पुन्हा एकदा जसप्रीत बुमराहला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. पण त्याचे फासे उलटे पडल्याचं दिसून आलं. संघाचं 81 वं षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह उतरला होता. तेव्हा ट्रेव्हिस हेडने तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. पण चौथ्या चेंडूपूर्वी भारताचं टेन्शन वाढलं.
चौथा चेंडू टाकण्यासाठी जसप्रीत बुमराहने धाव घेतली. पण चेंडू टाकण्यापूर्वी अचानक थांबला आणि मैदानातच बसला. बुमराहने यावेळी आपल्या ग्रोइन आणि खांद्याच्या दुखापतीची तक्रार केली. त्याच्या चेहऱ्यावर त्याचं दुखणं स्पष्ट दिसत होतं. त्याचे हावभाव पाहून भारतीय संघाचा रंगच उडून गेला. कर्णधार रोहित शर्मासह इतर खेळाडू त्याच्याकडे गेले. तेव्हा भारतीय संघाचा फिजिओ तिथे आला आणि त्याची तपासणी करू लागला. फिजिओने काही वेळ घेतला आणि भारतीय संघाचा जीव भांड्यात पडला. कारण जसप्रीत बुमराह पुन्हा गोलंदाजीसाठी उतरला. चौथ्या चेंडूवर हेडने चौकार मारला. पण बुमराहला गोलंदाजी करताना पाहून क्रीडाप्रेमी खूश होते.
बुमराहने काही वेळातच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला त्रिफळाचीत केलं. या डावातील त्याची चौथी विकेट होती. चुकून जसप्रीत बुमराहची दुखापत जास्त असती तर भारतीय संघ गोत्यात आला असता. कारण जसप्रीत बुमराहशिवाय इतर गोलंदाज तितके प्रभावी दिसले नाहीत. विकेट मिळाल्या तरी त्यासाठी त्यांना चांगलाच संघर्ष करावा लागल्याचं दिसत आहे. दुसरीकडे, अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला अजूनही ऑस्ट्रेलियात जाण्याची परवानगी मिळालेली नाही.