IND vs ENG : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी कर्णधारपदावरून बुमराहचं मोठं विधान, स्पष्टच सांगितलं की…
भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांची कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वा टीम इंडिया खेळणार आहे. सर्वकाही स्पष्ट असताना वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कर्णधारपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. दोन्ही संघाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधलं भविष्य या मालिकेवर अवलंबून आहे. त्यामुळे जोरदार सराव सुरु आहे. इंग्लंडच्या बेझबॉलची चर्चा रंगली आहे. असं असताना जसप्रीत बुमराहच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. जसप्रीत बुमराहने कसोटी संघाच्या नेतृत्व करण्याबाबत इच्छा वर्तवली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सकडून प्रेरणा घेत असल्याचं बुमराहने स्पष्ट केलं आहे. बुमराहने एका कसोटी सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. आता भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून सुरु होणार आहे. तत्पूर्वी जसप्रीत बुमराहने द गार्डियन एक मुलाखत दिली. बुमराहने या मुलाखतीत आपली रोखठोक भूमिका मांडली. “मी बेजबॉल क्रिकेटला जास्त भाव देत नाही. पण ते चांगलं क्रिकेट खेळत आहेत. आक्रमकतेमुळे विरोधकांना बॅकफूटवर ढकलत आहेत. त्यांच्यामुळे जगाला कळलं की कसोटी क्रिकेट खेळण्याचा असा काही प्रकार आहे. ”
कसोटी सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर करणार का? असा प्रश्न बुमराहला विचारण्यात आला. तेव्हा बुमराहने आपली भूमिका स्पष्ट करत सांगितलं की, ‘मी एका सामन्यात संघाचं नेतृत्व केलं आहे. हा एक गौरवास्पद क्षण होता. कसोटी खेळणं अभिमानाची बाब आहे आणि कर्णधारपद भूषवणं दुधात साखरेसारखं आहे. हा, ज्या सामन्यात कर्णधारपद भूषवलं आम्ही तो सामना गमावला, पण मालिकेत आघाडी होती. मला नेतृत्व करायला आवडेल. कधी कधी वेगवान गोलंदाज म्हणून तुम्ही फाईन लेगवर जाता तेव्हा सर्वकाही विसरून जाता. पण मला प्रत्येक निर्णयात सहभागी होणं आवडतं.’
“मी ज्या पिढीतून आलो आहे तिथे कसोटी क्रिकेटला राजाचा दर्जा आहे. मी त्याच आधारावर मूल्यांकन करेल. मी आयपीएलमधून सुरुवात केली खरं आहे. पण मी फर्स्ट क्लास क्रिकेटमधून गोलंदाजी करणं शिकलो. इथेच माझ्यातील गोलंदाजाची पारख झाली. विकेट घेण्याची कला विकसित केली. कसोटीत फलंदाजाला बाद करायचं असतं. त्यामुळे गोलंदाजापुढे मोठं आव्हान असतं.”, असंही बुमराह पुढे म्हणाला.