Jasprit Bumrah comeback : अनेक क्रिकेट चाहत्यांना जसप्रीत बुमराह कधी कमबॅक करणार हा प्रश्न पडलाय. मागच्या 6 ते 7 महिन्यांपासून हा टॅलेंटेड क्रिकेटर क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. स्ट्रेस फ्रॅक्चरची दुखापत बळावल्याने जसप्रीत बुमराह T20 वर्ल्ड कपला मुकला. त्यानंतर श्रीलंका, न्यूझीलंड आणि आता चालू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरीजमध्येही बुमराह खेळू शकला नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धची सीरीज सुरु होण्याआधी जसप्रीत बुमराहचा समावेश होईल, असं बोललं जात होतं. पण पहिल्या दोन कसोटीसाठी त्याची निवड झाली नाही. त्यानंतर उर्वरित दोन कसोटी आणि त्यानंतर होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे सीरीजसाठी सुद्धा जसप्रीत बुमराहची निवड झालेली नाही. त्यामुळे जसप्रीत बुमराहची दुखापत नेमकी किती गंभीर आहे? असा प्रश्न अनेक क्रिकेटचे जाणकार विचारतायत.
कुठल्या टुर्नामेंटमधून पुनरागमन?
IPL टुर्नामेंटमधून जसप्रीत बुमराह क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार आहे. मुंबई इंडियन्स या आपल्या फ्रेंचायजींकडून जसप्रीत बुमराह गोलंदाजी करताना दिसेल. इनसाइड स्पोर्ट्सने हे वृत्त दिलय. इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये जसप्रीत बुमराहचा वर्कलोड कसा मॅनेज करायचा हा महत्त्वचा मुद्दा आहे. आयपीएलनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप त्यानंतर वनडे वर्ल्ड कप आहे. या महत्त्वाच्या टुर्नामेंटसाठी जसप्रीत बुमराह फिट राहणं आवश्यक आहे.
मुंबई इंडियन्स अट मान्य करेल?
वर्कलोड मॅनेजमेंटतंर्गत जसप्रीत बुमराहसाठी काही अटी घातल्या, तर मुंबई इंडियन्स त्या मान्य करेल का? हा मुख्य प्रश्न आहे. कारण जसप्रीत बुमराहसाठी मुंबई इंडियन्स वर्षाला 12 कोटी रुपये मोजते. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी आणि तीन वनडे सामन्यांसाठी टीम जाहीर केली. पण त्यात जसप्रीत बुमराहचा समावेश केलेला नाही.
NCA ने परवानगी दिली?
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (NCA) जसप्रीत बुमराहला कुठल्याही स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिलेली नाही. क्रिकबझने हे वृत्त दिलय. बीसीसीआयच्या बंगळुर येथील केंद्रात जसप्रीत बुमराह काही सराव सामने खेळणार असल्याची अफवा पसरली होती. पण NCA ने त्याला अशी कुठलीही परवानगी दिलेली नाही.
स्ट्रॅटजी काय असेल?
जसप्रीत बुमराहला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी मिळेल. पण टीम व्यवस्थापन त्याच्या वर्कलोडवर लक्ष ठेवून असेल. त्याची स्ट्रॅटजी अजून ठरवायची आहे. आयपीएलमध्ये काही परदेशी बोर्डांकडून विशेष अटींवर आपल्या खेळाडूंना NOC दिली जाते. नेट्समध्ये गोलंदाजांना 24 पेक्षा जास्त चेंडू टाकण्याची परवानगी नसते. नियमितपणे खेळाडूंचा फिटनेस तपासला जातो. बीसीसीआय हीच स्ट्रॅटजी या आयपीएलमध्ये वापरु शकते. सर्वांसाठी नाही, पण बुमराहसाठी काही अटी घातल्या जाऊ शकतात. फक्त मुंबई इंडियन्सने या अटी मान्य करणं गरजेच आहे.