जय शाह यांची परवानगी आणि पीसीबीला मिळाले 586 कोटी, तरीही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रडणार पाकिस्तान
29 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पाकिस्तानात आयसीसी स्पर्धेचं आयोजन होणार आहे. यासाठी पीसीबी वाटेल ते करण्यासाठी तयार आहे. यासाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. पण टीम इंडिया पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे. त्यामुळे स्पर्धेच्या आयोजनापू्र्वी पाकिस्तानला घाम फुटला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 205 स्पर्धा पाकिस्तानात होणार याबाबतच्या बातम्या रोज येत आहेत. फेब्रुवारी आणि मार्च 2025 दरम्यान ही स्पर्धा होईल असं प्रारूप वेळापत्रकही पाकिस्तानने दिलं आहे. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार आहेत. तसेच भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये होतील हे देखील जाहीर केलं आहे. पण टीम इंडिया पाकिस्तानात येणार की नाही यावर सर्वकाही अडकलं आहे. बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवावं अशी विनंती गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे. पण अजूनही याबाबत चित्र स्पष्ट नाही. भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की हायब्रिड मॉडेलवर सामने होणार याबाबत काही ठरलेलं नाही. असं असताना बीसीसीआय सचिव जय शाह यांनी पाकिस्तानला 70 मिलियन डॉलर म्हणजेच 586 कोटींचं बजेट पास केलं आहे. पण ही स्पर्धा पाकिस्तानात होणार की नाही याबाबत काहीच स्पष्ट नाही. कोलंबोत झालेल्या आयसीसीसी बैठकीत बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी भाग घेतला होता. या मीटिंगमध्ये पीसीबीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बजेट सादर केलं होतं. पीटीआयच्या रिपोर्टनुसार आता हे बजेट पास झालं आहे.यावर बीसीसीआय सचिव जय शाह यांनी स्वाक्षरी केली आहे.
आयसीसीच्या फायनान्स अँड कमर्शियल कमिटीचं अध्यक्षपद जय शाह यांच्याकडे आहे. हीच कमिटी स्पर्धेच्या बजेटवर शेवटची मोहोर लावते. रिपोर्टनुसार, पीसीबी आणि आयसीसीच्या फायनान्स डिपार्टमेंटने स्पर्धेसाठी बजेट तयार केलं आहे. या बजेटची चाचपणी जय शाह यांच्या अध्यक्षतेखालीली कमिटीने केली. त्यानंतर या बजेटला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. या स्पर्धेचं संपूर्ण आयोजन पाकिस्तान होईल असं नाही. अजूनही ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर होण्याची शक्यता जास्त आहे. कारण जय शाह यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीने 4.5 मिलियन डॉलर म्हणजेच 37.67 कोटी रुपयांचं अतिरिक्त बजेट ठेवलं आहे. याचा उपयोग इतर देशात भारताचे सामने करण्यासाठी होऊ शकतो.
पाकिस्तानात 29 वर्षानंतर आयसीसी स्पर्धा होणार आहे. यापूर्वी भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेने मिळून 1996 वर्ल्डकपचं आयोजन केलं होतं. आता पाकिस्तान संपूर्ण स्पर्धा आपल्या देशात आयोजित करण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी पीसीबीने स्पर्धेचं प्रारुप वेळापत्रकही जाहीर केलं होतं. यात भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये ठेवले होते. तर भारत पाकिस्तान सामना 1 मार्चला ठेवला आहे.