VIDEO | सचिन, रोहितनंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूची कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी आर्थिक मदत
कोरोनाशी लढण्यासाठी भारताला जगभरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. तसेच भारतातील अनेक खेळाडू, सेलिब्रेटीदेखील मदतीसाठी पुढे येत आहेत.
मुंबई : भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सामोरा जात आहे. देशात सध्या मेडिकल ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाशी लढण्यासाठी भारताला जगभरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. तसेच भारतातील अनेक दिग्गज खेळाडू, सेलिब्रेटीदेखील मदतीसाठी पुढे आले आहेत. दिग्गज क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकरने दोन दिवसांपूर्वी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वतःचे योगदान देत 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. त्यानंतर आता अजून एका भारतीय क्रिकेटपटूने या लढ्यात स्वतःचं योगदान दिलं आहे. जयदेव उनादकट असं या क्रिकेटपटूचं नाव आहे. (Jaydev Unadkat Donates 10 percent Of IPL Salary For India’s Fight Against Covid-19)
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाऱ्या जलदगती गोलंदाज जयदेव उनादकटने इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) सॅलरीमधील 10 टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत जयदेवने स्वतःच याबाबतची माहिती जाहीर केली आहे. व्हिडीओमध्ये त्यानं म्हटलं आहे की, “गेल्या काही आठवड्यांपासून मला तुमच्याबरोबर काहीतरी शेअर करण्याची इच्छा होत आहे. आपला देश प्रचंड मोठ्या संकटातून जात आहे आणि मला माहित आहे की, या परिस्थितीत आम्ही क्रिकेट कसे खेळत आहोत. मला माहित आहे की कोणाचंही वैयक्तिक नुकसान किती वेदनादायक असू शकतं. आपल्या जवळच्या मित्रांना अशा परिस्थितीशी लढताना पाहणं खूप हृदयद्रावक आहे. मी सध्या या दोन्ही प्रकारच्या स्थिती अनुभवतोय.”
जयदेव म्हणाला की, “अशा परिस्थिती क्रिकेटची स्पर्धा सुरु आहे. ही स्पर्धा खेळवणं योग्य की अयोग्य यात मी पडत नाही. परंतु मी प्रामाणिकपणे सांगेन की अशा परिस्थितीत कुटुंब आणि मित्रांपासून दूर राहणं कठीण आहे. मला वाटतं हा खेळ बर्याच लोकांच्या आयुष्यात आनंद देण्याचं काम करत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कणखर राहा. सोबतच आपण सर्वांनी एकत्र येत आपआपल्या परीने योगदान देणं, गरजूंची मदत करणं गरजेचं आहे.”
I am contributing 10% of my IPL salary towards providing essential medical resources for those in need. My family will make sure it reaches the right places. Jai Hind! pic.twitter.com/XvAOayUEcd
— Jaydev Unadkat (@JUnadkat) April 30, 2021
जयदेवची आयपीएलमधील कामगिरी
राजस्थानकडून खेळणाऱ्या या वेगवान गोलंदाजांने या 14 व्या मोसमात आतापर्यंत एकूण 4 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 113 धावा देत 4 विकेट्स घेतल्या आहेत. 15 धावा देऊन 3 विकेट्स ही त्याची या मोसमातील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. जयदेवने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 84 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 29.80 च्या सरासरीने आणि 8.73 इकॉनॉमी रेटने 85 विकेट्स घेतल्या आहेत. 25 धावा देत 5 विकेट्स ही त्याची बेस्ट कामगिरी आहे. जयदेवने एकूण 2 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सचिन तेंडुलकर मैदानात
सचिन तेंडूलकरने मिशन आँक्सिजन इंडीयाला 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. दिल्लीतील 250 उद्योजक तरूणांनी सुरू केलेल्या या मोहिमेत सचिनने सहभाग घेतला आहे. सचिनने गेल्या वर्षीदेखील अशीच मदत केली होती. तेव्हा त्याने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी दिला होता. सचिन तेंडुलकरप्रमाणे इतर काही भारतीय आणि परदेशी खेळाडूंनी यापूर्वीच आपआपल्या परीने मदत केली आहे. त्यामध्ये रोहित शर्मा, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, महिला क्रिकेटपटू मिताली राज हिनेदेखील कोरोनाशी लढणाऱ्या भारताला मदत केली आहे.
ब्रेट लीकडून ऑक्सिजनसाठी 43 लाखांची मदत
माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली यानेदेखील भारताला मदत केली आहे. ब्रेट लीने ऑक्सिजन खरेदीसाठी 1 बिटकाईन म्हणजेज 43 लाखांची केली आहे. ब्रेट लीनं मदत जाहीर करताना भारत हे माझं दुसर घर असल्याची भावना व्यक्त केली आहे. भारतातील कोरोना परिस्थितीवरून त्यानं चिंता व्यक्त केली आहे. क्रिकेटमधील कारकीर्द आणि निवृत्तीनंतर इथल्या लोकांचं माझ्या मनात विशेष स्थान आहे. आपल्याला एकत्र येऊन लढण्याची गरज ब्रेट लीनं व्यक्त केली.
पॅट कमिन्सकडून 50 हजार अमेरिकन डॉलर्सची मदत
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्सने (Pat Cummins) 50 हजार अमेरिकन डॉलर्सची (जवळपास 37 लाख रुपये) मदत केली आहे. कमिन्सने पीएम केअर फंडाला ही मदत दिली आहे. पॅट कमिन्स सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाकडून खेळत आहे. कमिन्सने त्याच्या या मदतीबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. तसेच त्याने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या इतर खेळाडूंनादेखील अशीच मदत करण्याचे आवाहन केलं होतं. कमिन्सने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ”एक खेळाडू म्हणून माझ्यासुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत आणि मी पीएम केअर फंडासाठी काही निधी दान करत आहे, विशेषकरून भारतातील हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनच्या खरेदीसाठी हा निधी असेल. आयपीएलमधील मी माझ्या सहकाऱ्यांनाही मदतीचं आवाहन करतो,असं तो म्हणाला होता.
श्रीवत्स गोस्वामीचाही पुढाकार
पॅट कमिन्सच्या पुढाकारानंतर एक एक खेळाडू कोरोना विरुद्धच्या लढ्यात आपल्या परीने मदत करत आहेत. आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या श्रीवत्स गोस्वामीने डोनेटकार्ट चॅरिटेबल सोसायटीला 90 हजारांचे आर्थिक साहाय्य केलं आहे. या मदतीनंतर या संस्थेने ट्विट करत श्रीवत्स गोस्वामीचे आभार मानले आहेत. या संस्थेने केलेल्या ट्विटमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण, कॅप्टन डेव्हिड वॉर्नर आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांचाही उल्लेख (मेन्शन) केलं आहे, कारण या खेळाडूंनीदेखील त्यांच्या परीने मदत केली आहे.
संबंधित बातम्या
ना मोठं नाव, ना मोठा सेलिब्रिटी, ऑस्ट्रेलियाच्या दिलदार क्रिकेटपटूकडून भारताला लाखोंचा ऑक्सिजन बहाल
(Jaydev Unadkat Donates 10 percent Of IPL Salary For India’s Fight Against Covid-19)