उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात देवदत्त पडिक्कलची बॅट तळपली, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ठोठावलं दार
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेनंतर देवदत्त पडिक्कलने थेट देशांतर्गत सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीत भाग घेतला. उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटक आणि बडोदा यांच्यात सामना रंगला. कर्नाटककडून खेळताना शानदार शतक ठोकलं आणि विजयाचं मोलाचं योगदान दिलं.
विजय हजारे स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचा सामना कर्नाटक आणि बडोदा यांच्यात वडोदऱ्याच्या मोतीबाग स्टेडियममध्ये रंगला. बडोद्याने नाणेफेक जिंकून कर्नाटकला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. ओपनिंग आलेल्या देवदत्त पडिक्कलने या सामन्यात साजेशी खेळी केलीय टीमची गरज आणि मोठी धावसंख्येचं लक्ष्य डोळ्यासमोर सावध पण चांगली खेळी केली. खरं तर कर्नाटक संघाला सुरुवातीला मयंक अग्रवालच्या रुपाने धक्का बसला. अवघ्या 6 धावांवर असताना तंबूत परतला. त्यामुळे देवदत्त पडिक्कलची जबाबदारी वाढली होती. त्याने ही जबाबदारी ओळखून कामगिरी केली. बडोद्याच्या अनुभवी गोलंदाजांना सामना करताना पडिक्कलने मैदानात चौकारांचा पाऊस पाडला. याद्वारे त्याने अवघ्या 96 चेंडूत 1 उत्तुंग षटकार आणि 15 चौकारांसह आपले शतक पूर्ण केले. मात्र शतकी खेळी केल्यानंतर वेगाने धावा करण्याच्या नादात 102 धावांवर बाद होत तंबूत परतला. यावेळी त्याला फलंदाजीत दुसऱ्या बाजूने अनिशने साथ दिली. त्यानेही 64 चेंडूत 54 धावांची खेळी केली.
कर्नाटकने देवदत्त पडिक्कलच्या शतकी खेळीच्या जोरावर 50 षटकात 8 गडी गमवून 281 धावा केल्या आणि विजयासाठी 282 धावांचं आव्हान दिलं. बडोद्याने ही विजयी धावसंख्या गाठण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण विजयासाठी 5 धावा तोकड्या पडल्या आणि विजय हातून गेला. बडोद्याच्या शशावत रावतने 104 धावांची खेळी केली. पण देवदत्त पडिक्कलच्या शतकापुढे ही खेळी फेल गेली. सामना संपल्यानंतर देवदत्त पडिक्कलला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. देवदत्तने या खेळीसह बीसीसीआय निवड समितीला विचार करण्यास भाग पाडलं आहे. वनडे फॉर्मेटमध्ये त्याची ही खेळी दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यामुळे त्याच्या नावाचा विचार करणं भाग आहे. पण सरते शेवटी कोणाला इंग्लंड आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संधी मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
कर्नाटक (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, अनीश केव्ही, स्मरण रविचंद्रन, कृष्णन श्रीजीथ (विकेटकीपर), अभिनव मनोहर, हार्दिक राज, श्रेयस गोपाल, अभिलाष शेट्टी, वासुकी कौशिक, प्रसीद कृष्णा.
बडोदा (प्लेइंग इलेव्हन): शशावत रावत, निनाद अश्विनकुमार रथवा, अतित शेठ, शिवालिक शर्मा, कृणाल पंड्या (कर्णधार), विष्णू सोलंकी (विकेटकीपर), महेश पिठिया, भार्गव भट्ट, भानू पानिया, राज लिंबानी, लुकमान मेरीवाला.