IND vs SA T20 : भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेतील सर्व विक्रम जाणून घ्या, धावा करण्यात रोहित अव्वल, सर्वाधिक षटकार कुणाच्या नावावर?
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांमध्ये भारताचे वर्चस्व आहे.
नवी दिल्ली : आयपीएलचा (IPL 2022) पंधरावा सीजन संपला आहे. आता भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी काम करतोय. सर्वात आधी भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेला (south africa team) भिडणार आहे. 9 जूनपासून या टी-20ची सुरुवात होणार आहे. सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेची टीम भारतात पोहचली आहे. तर दुसरीकडे भारतीय संघातील खेळाडू 5 जूनला केएल राहुलच्या नेतृत्वात येईल. त्यानंतर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध (IND vs SA) पहिला टी-20 सामना 9 जूनला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवला जाईल. या मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियासाठी मालिका जिंकण्याची जबाबदारी केएल राहुलवर असेल. जेव्हा जेव्हा हे दोन संघ भिडतात तेव्हा धावा होतात. या मालिकेतही अनेक विक्रम केले जाऊ शकतात.
संघात अनेक स्टार खेळाडू
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाने तरबेज फलंदाज आणि गोलंदाज निवडले आहेत. भारतीय संघात अनेक चांगल्या खेळाडूंना विश्रांती देऊनही अनेक मॅच विनर्सचा समावेश आहे. त्यांच्यामध्ये आयपीएलचे अनेक स्टार्स आहेत आणि तेच संघाला विजय मिळवून देऊ शकतात. IPL 2022चे विजेतेपद पटकावणारा गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याही खेळताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत तो राहुलला महत्त्वाच्या टिप्स देईल. याशिवाय ऋषभ पंतला उपकर्णधारपद देण्यात आलंय.2007 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 सामन्यांच्या आकडेवारीबद्दल सांगायचं झाल्यास यामध्ये दोन देशांमधील सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
दोन्ही संघाने किती टी-20 खेळले?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 15 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 9 सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सहा सामने जिंकले आहेत. भारतामध्ये दोन्ही संघांमध्ये 4 सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने केवळ एकच सामना जिंकला असून दक्षिण आफ्रिकेने तीन सामने जिंकले आहेत.
सर्वाधिक धावा कुणी काढली?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील T20 मध्ये सर्वात मोठ्या धावसंख्येचा विक्रम प्रोटीजच्या (SA) या नावावर आहे. दक्षिण आफ्रिकेनं 2012मध्ये जोहान्सबर्ग येथे भारताविरुद्ध 20 षटकात 4 गडी गमावून 219 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची सर्वात मोठी धावसंख्या 20 षटकात 5 विकेट्सवर 203 धावा आहे.
दक्षिण आफ्रिकेची भारतातील सर्वोच्च धावसंख्या तीन बाद 200 धावा,ही त्यांनी 2015मध्ये धर्मशाला येथे केली होती. त्याचवेळी घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची सर्वात मोठी धावसंख्या पाच विकेट्सवर 199 धावा आहे. टीम इंडियाने 2015 मध्ये धर्मशालामध्येच हा स्कोअर केला होता.
रोहित शर्माच्या सर्वाधिक धावा
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांमध्ये भारताचे वर्चस्व आहे. मात्र, या मालिकेत या पहिल्या पाच फलंदाजांपैकी एकही फलंदाज खेळत नाही. या दोघांमधील सामन्यात रोहित शर्मानं सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 13 सामन्यात 362 धावा केल्या आहेत. सुरेश रैना दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 सामन्यात 339 धावा केल्या आहेत. जेपी ड्युमिनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. या दोघांमधील सामन्यात त्याने भारताविरुद्ध 295 धावा केल्या आहेत.