भारत आणि महाराष्ट्राचं क्रिकेटवर किती प्रेम आहे याचा प्रत्यय आज मुंबईत बघायला मिळत आहे. टीम इंडियाचे लाखो चाहते आज मुंबईत नरिमन पॉईंट परिसरात दाखल झाले आहेत. या चाहत्यांकडून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. टीम इंडियाने देशाला वर्ल्ड कप जिंकून दिल्यामुळे प्रत्येक खेळाडूचं क्रिकेट चाहत्यांकडून कौतुक केलं जात आहे. नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह हा परिसर समुद्र किनारा लगतचा परिसर आहे. इथे नेहमी पर्यटक येत असतात. मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावर समुद्राला येणारं उधाण, समुद्राच्या लाटा पाहण्यासाठी नेहमी गर्दी बघायला मिळते. पण आज मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावर क्रिकेट चाहत्यांचा भलामोठा जनसागरच लोटला आहे. जिथे बघावं तिथे गर्दी आणि माणसं दिसत आहेत. अतिशय घोषणाबाजी केली जात आहे. अतिशय उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे.
टीम इंडियाने टी ट्वेन्टी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ते आज मायदेशी परतले आहेत. टीम इंडिया आज दिल्लीत दाखल झाली. टीम इंडियाच्या खेळाडूंनी दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दिल्लीतला कार्यक्रम पार पडल्यानंतर टीम इंडिया आज मुंबईत दाखल होत आहे. या खेळाडूंची भव्य विजयी मिरवणूक आज काढण्यात येत आहे. नरिमन पॉईंटच्या एनसीपीए परिसरातून ही विजयी यात्रा निघणार आहे. ही यात्रा वानखेडे स्टेडियमवर जावून संपणार आहे. इथे भव्य कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आजच्या या कार्यक्रमासाठी क्रिकेट चाहत्यांना वानखेडे स्टेडियममध्ये फ्रि एन्ट्री देण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची अभूतपूर्व गर्दी बघायला मिळत आहे.
विशेष म्हणजे मुंबईत पावसालादेखील सुरुवात झाली आहे. धो-धो पाऊस पडत आहे. पण या पावसाने टीम इंडियाच्या लाखो चाहत्यांचा उत्साह कमी केलेला नाही. याउलट चाहत्यांच्या आनंदात दुप्पट वाढ झाली आहे. भर पावसात तरुण-तरुणींनी विजयी यात्रेसाठी मरीन ड्राईव्ह परिसरात गर्दी केली आहे. कितीही पाऊस झाला तरी आम्ही टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावर उभेच राहणार, असं तरुण म्हणत आहेत. लाखो चाहते आपल्या आवडत्या क्रिकेटरची एक झलक पाहण्यासाठी गेल्या अनेक तासांपासून इथे ताटकळत उभे आहेत.
टीम इंडियाच्या स्वागतासाठी क्रिकेट प्रेमींनी लाखोंच्या संख्येत वानखेडे स्टेडियम परिसरात गर्दी केली आहे. वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये, बाहेर, रस्त्यावर प्रचंड जनसागर लोटलेला आहे. विशेष म्हणजे पाऊस पडतोय. पण या पावसाने क्रिकेट चाहत्यांच्या आनंदावर कोणत्याही प्रकारचं विरजन आणलेलं नाही. याउलट भर पावसात चाहत्यांकडे सेलीब्रेशन केलं जात असल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे चाहत्यांनी गर्दी इतकी केलीय की मरीन ड्राईव्ह परिसर चक्काजाम झालाय.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाला याची देही याची डोळा पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने वानखेडे स्टेडियम आणि मरीन ड्राईव्हच्या दिशेला जात आहेत. त्यामुळे मुंबई लोकलमध्येदेखील प्रचंड गर्दी बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे लोकलमध्ये तरुणांकडून टीम इंडियाच्या जयघोषाच्या घोषणाही केल्या जात आहेत. लोकलमधील वातावरणदेखील क्रिकेटमय झालं आहे. दादर रेल्वे स्थानक, चर्चगेट रेल्वे स्थानक इथे देखील प्रचंड गर्दी आहे.