चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स नाही! रिंकु सिंहने आयपीएलमध्ये या संघाकडून खेळण्याची व्यक्त केली इच्छा
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यामुळे या लिलावानंतर संघात मोठी उलथापालथ होणार आहे. त्यामुळे क्रीडारसिकांना उत्सुकता लागून आहे. असं असताना रिंकु सिंह याने या लिलावापूर्वीच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. केकेआरने रिटेन केलं नाही तर कोणत्या संघाकडून खेळायची इच्छा आहे, हे स्पष्ट केलं.
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. या लिलावात कोट्यवधी रुपयांची उधळण होणार यात शंका नाही. कारण फ्रेंचायझींना सध्या तरी चार खेळाडू रिटेन करण्याची मुभा आहे. त्यामुळे इतर खेळाडूंसाठी बोली लागणार आहे. यात नाईलाजास्तव काही खेळाडूंना सोडावं लागणार आहे. त्यामुळे स्टार खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी जोरदार चढाओढ पाहायला मिळेल यात शंका नाही. त्यात खेळाडूंनाच माहिती नाही की त्यांना संघात ठेवणार की रिलीज करणार ते.. यात कोलकाता नाईट रायडर्सचा मधल्या फळीचा फलंदाज रिंकु सिंह हा देखील आहे. रिंकु सिंहला माहिती नाही की संघ त्याला ठेवेल की रिलीज करेल. पण त्याने या प्रक्रियेपूर्वीच एका संघाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. केकेआरने रिलीज केलं तर आवडत्या खेळाडूच्या संघाकडून खेळायची इच्छा व्यक्त केली आहे. पण ही फक्त इच्छा असून त्याच्या हातात काहीच नाही. पण त्याने आपल्या आवडत्या संघाबाबत सांगून मन मोकळं केलं आहे.
रिंकु सिंहने टुडे ग्रुपशी बोलताना सांगितलं की, पुढच्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्सने रिटेन केलं नही तर आरसीबीकडून खेळायला आवडेल. आरसीबीकडून खेळायला आवडण्याचं कारणही त्याने सांगितलं. या संघात विराट कोहली असल्याने त्याला या संघाकडून खेळण्याची इच्छा आहे. विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या पर्वापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासोबत आहे. आतापर्यंतच्या 17 पर्वात विराट कोहली या संघाकडून खेळला आहे. दुसरीकडे, 18व्या पर्वातही संघ त्याला रिलीज करणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे.
रिंकु सिंहने विराट कोहलीबाबत दिलखुलासपणे सांगितलं. ‘विराट कोहलीने मला पहिली बॅट दिली होती पण तुटली. त्यानंतर मी त्याच्याकडे पुन्हा बॅटसाठी आग्रह धऱला. त्याने मला पुन्हा बॅट दिली.’ रिंकु सिंह आयपीएलमध्ये 2023 पासून चर्चेत आला. गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटच्या षटकात सलग पाच षटकार मारले आणि सामना जिंकवला. त्यामुळे सर्वत्र रिंकु सिंहच्या नावाची चर्चा सुरु झाली. भारतीय संघात त्याला संधी मिळाली आणि तिथेही त्याचा स्ट्राईक रेट जबरदस्त आहे. दुसरीकडे, आरसीबीने आतापर्यंत एकही जेतेपद जिंकलेलं नाही. यंदा जेतेपदावर नाव कोरावं यासाठी संघ बांधणी महत्त्वाची ठरणार आहे.