द्रोणाचार्य Ramakant Achrekar यांच्या स्मृती स्मारकाचे सचिन तेंडुलकर-राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण
Ramakant Achrekar Memorial Unveiled : असंख्य क्रिकेटपटूंना घडवणाऱ्या सर रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाराचं उद्घाटन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.
क्रिकेटची पंढरी आणि असंख्य क्रिकेटपटूंचं पालणाघर असलेल्या दादरमधील शिवाजी महाराज पार्कातून मोठी बातमी समोर आली आहे. असंख्य आणि मातब्बर क्रिकेटपटूंचे दिग्गज प्रशिक्षक द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकराचं शिवाजी महाराज पार्कमध्ये अनावरण करण्यात आलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि मनसेप्रमुख या स्मारकाचे सल्लागार राज ठाकरे यांच्या हस्ते स्मृती स्मारकाचे अनावरण करण्यात आले. यावेळेस आचरेकर सरांची मुलगी विशाखा दळवी आणि कुटुंबीय, माजी क्रिकेटर प्रवीण आमरे उपस्थित होते.
सर रमाकांत आचरेकर यांनी त्यांची सारी हयात मुंबईतील दादरमधील शिवाजी महाराज पार्कमध्ये शिष्यांना क्रिकेट धडे देण्यात घालवली. शिवाजी पार्क मैदान आचरेकर सरांची कर्मभूमी होती. त्यांची स्मृती जपण्यासाठी आणि भावी क्रिकेटपटूंना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हे स्मृती स्मारक उभारण्यात आलं. शिवाजी महाराज पार्क गेट क्रमांक 5 येथे हे स्मृती स्मारक उभारण्यात आलं आहे. रमाकांत आचरेकर यांची आज (3 डिसेंबर) जंयती आहे. सरांच्या जयंतीचं निमित्त साधत या स्मारकाचं अनावरण करण्यात आलं.
स्मृती स्मारकाचं स्वरुप
रमाकांत आचरेकर सरांच्या या स्मृती स्मारकात क्रिकेट साहित्यांचा समावेश केलेला आहे. या स्मृती स्मारकात स्टंप्स, पॅड्स, ग्लोव्हज, बॉल, हेल्मेट आणि बॅट या क्रिकेट साहित्यांचा समावेश करण्यात आला आहे. स्मारकातील बॅटवर आचरेकर सरांची टोपी पाहायला मिळत आहे. आचरेकर सरांची विशिष्ट आकाराची टोपी ही त्यांची ओळख होती.
राज ठाकरेंकडून गुरुचं महत्त्व अधोरेखित
दरम्यान सर आचरेकरांच्या स्मृतीच्या अनावरणानंतर राज ठाकरे यांनी गुरुचं महत्त्वं अधोरेखित केलं. “खरंतर हे स्मारक आधीच व्हायला पाहिजे होतं. आचरेकर सर म्हटलं की सचिन तेंडुलकर हे एक नाव आपल्या डोळ्यांसमोर येतं. आचरेकर सरांनी देशासाठी जितके खेळाडू निर्माण केले तितके जगात कोणत्या कोचने खेळाडू तयार केले असतील, असं मला वाटत नाही”, असं म्हणत राज ठाकरे यांनी आचरेकर सरांचं क्रिकेटमधील असलेलं योगदान अधोरेखित केलं.
स्मृती स्मारकाचं अनावरण
VIDEO | Former Indian cricketer Sachin Tendulkar (@sachin_rt) and Maharashtra Navnirman Sena (MNS) chief Raj Thackeray (@RajThackeray) unveil Indian cricket coach Ramakant Achrekar memorial in Mumbai.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/ihdsnwp6kI
— Press Trust of India (@PTI_News) December 3, 2024
“गुरुची काय किंमत असते, गुरुची काय किंमत असावी, गुरुला किती पुजावं? किती मोठं करावं आणि लोकांसमोर ठेवावं, ही पद्धत आपल्याकडे नाहीच. शिक्षक नावाची गोष्टच आपल्याकडे राहिलेली नाही. माझ्याकडे 10-12 वीचे विद्यार्थी पास झाल्यावर येतात. तेव्हा मी त्यांना विचारतो की काय करणार पुढे? या प्रश्नावर एकही विद्यार्थी शिक्षक व्हायचंय, असं म्हणत नाही. ज्या देशात एकाही विद्यार्थ्याला शिक्षक होऊ वाटत नाही, त्या देशाचं पुढे काय होणार? हे माहित नाही”, असंही राज ठाकरेंनी म्हटलं.