Sachin Tendulkar : सचिनला आचरेकर सरांकडे नेणारी ती व्यक्ती कोण? मास्टर ब्लास्टरनेच सांगितलं
Sachin Tendulkar Interview : दिग्गज महान प्रशिक्षक सर रमाकांत आचरेकर यांनी सचिन तेंडुलकर याला घडवलं.सचिनला क्रिकेटची बाराखडी शिकवली. मात्र सचिनला आचरेकर सरांकडे कोण घेऊन गेला? जाणून घ्या.

टीम इंडियाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन 1 दशकापेक्षा अधिक काळ लोटलाय. मात्र त्यानंतरही सचिनने केलेले रेकॉर्ड्स हे अबाधित आहेत. सचिनचे असे काही विक्रम आहेत ज्याच्या आसपासही कुणी नाही. सचिनचे रेकॉर्ड येत्या काळात ब्रेक होतील ही मात्र ते इतक्यात शक्य नाही. सचिनला घडवण्यात त्याचे महान प्रशिक्षक सर रमाकांत आचरेकर सरांचं मोठं योगदान आहे.सचिन कायमच प्रत्येक मुलाखतीत रमाकांत आचरेकर सरांचा उल्लेख करतो, त्यांच्यासोबतच्या आठवणी सांगतो. त्यांनी कसं मार्गदर्शन केलं? हे सांगत असतो. मात्र सचिनला आचरेकर सरांकडे कुणी नेलं? याबाबत सचिनने प्रकट मुलाखतीत सांगितलं.
पुण्यात चितळे उद्योग समुहाच्या अमृत महोत्सावानिमित्ताने खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात क्रिकेट विश्लेषक सुनंदन लेले यांनी सचिनची मुलाखत घेतली. सचिनने या मुलाखतीत अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. तु कुणाचा कृतज्ञ आहेस? असा प्रश्न लेले यांनी सचिनला केला. यावर सचिनने काय उत्तर दिलं जाणून घेऊयात.
सचिन काय म्हणाला?
“नक्कीच कुटुंब, माझ्या आयुष्यात फक्त क्रिकेटच नाहीय. आयुष्यात क्रिकेटआधी आणि त्यानंतर अनेक घटना घडल्या. त्यामुळे माझ्यासाठी कुटुंब फार महत्त्वाचं आहे. क्रिकेटमध्ये अजित (सचिन तेंडुलकर यांचे बंधु) जर मला आचरेकर सरांकडे घेऊन गेला नसता तर, मला नाही वाटत आज मी इथे बसून तुमच्यासोबत असा बोलत असतो. माझ्यासोबत अनेक खेळाडू होते. ते जर माझ्यासोबत धावले नसते तर माझ्या इतक्या धावा झाल्या नसत्या. असंख्य प्रशिक्षकांचं मार्गदर्शन मिळालं. तुमचा (चाहत्यांचा) सपोर्ट होता. या सर्व गोष्टी होत्याच”, असं म्हणत सचिनने त्याच्या आयुष्यात कुटुंबाचं असलेलं महत्त्व ठळकपणे अधोरेखित केलं.
“माझ्या भोवती भरपूर मोठी टीम”
“मी एका फॉर्म्युला वन कारसारखा होतो. माझ्या भोवती भरपूर मोठी टीम होती, जी तेवढीच मेहनत करत होती. यात कुटुंबिय, डॉक्टर, फिजिओ आणि ग्राउंड्समॅनचा समावेश होता. मला जेव्हा सराव करायचा असायचा तेव्हा ग्राउंड्समॅन अचूक खेळपट्टी तयार करुन द्यायचे. माझे मित्र एका शब्दावर कधीही सरावाला सोबत यायचे”, अस म्हणत सचिनने त्याच्या यशामागे असलेल्या या पडद्यामागच्या हिरोंचाही उल्लेख केला.