LLC Auction 2024: लीजेंड्स लीगमध्ये प्रवीण तांबे चमकला, वयाच्या 52 व्या वर्षी लागली इतक्या लाखांची बोली
लीजेंड्स लीग स्पर्धेचं यंदा तिसरं पर्व आहे. या स्पर्धेपूर्वी दिल्लीत लिलाव पार पडला. यावेळी काही खेळाडूंना मोठी रक्कम मिळाली. तर काही दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहिले. पण या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेतलं ते 52 वर्षांच्या प्रवीण तांबेने...चला जाणून घेऊयात
क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या आणि मैदान गाजवलेल्या खेळाडूंना पाहण्याची पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. दोन पर्वात लीजेंड्स लीग स्पर्धेने चांगला नावलौकीक मिळवला आहे. आता या स्पर्धेचं तिसरं पर्व पार पडणार आहे. ही स्पर्धा 20 सप्टेंबरपासून सुरु होणार असून 16 ऑक्टोबरला अंतिम सामना होणार आहे. एकूण सहा संघात 25 सामने होणार आहेत. या स्पर्धेपूर्वी खेळाडूंसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. सहा संघ मालकांनी खेळाडूंना संघात घेण्यासाठी मोठी रक्कम मोजली. श्रीलंकेच्या इसुरू उडाना याच्यासाठी अर्बनायजर्स हैदराबादने 61.9 लाखांची बोली लावली. तर ब्रेट ली, मार्टिन गप्टिलसारखे खेळाडू अनसोल्ड राहिले. असं असताना भारताच्या प्रवीण तांबेवर लागलेल्या बोलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. प्रवीण तांबेसाठी उडिशाच्या कोणार्क सूर्याज संघाने मोठी बोली लावली.
कोणार्क सूर्याजने 28 लाख रुपये मोजून त्याला संघात घेतलं आहे. 52 व्या वर्षीही प्रवीण तांबे फिट अँड फाईन आहे. त्यामुळे त्याला संघात घेण्यासाठी चढाओढ दिसली. मागच्या पर्वात प्रवीण तांबे इंडिया कॅपिटल्स संघाकडून खेळला होता. प्रवीण तांबेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. पण आयपीएलमध्ये त्याची जादू दिसली. आयपीएलमध्ये 33 सामन्यात त्याने 18 धावा केल्या आहेत. तसेच 28 विकेट घेतल्या आहेत. वयाच्या 41 व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केल्याने आश्चर्याचा धक्का बसला होता. 2014 मध्ये कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रीक घेतली होती. आयपीएलमधील 12 वी हॅटट्रीक होती.
The legend of Tambe keeps growing 🫶🏼#BossLogonKaGame #LegendsLeagueCricket #LLCseason3 #TheBigBid pic.twitter.com/heUpQSr2TJ
— Legends League Cricket (@llct20) August 29, 2024
राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये 2013 ला पदार्पण केलं होतं. पदार्पणाच्या सामन्यात प्रवीण तांबेने 4 षटकं टाकली आणि एकही विकेट मिळाला नाही. पण 30 धावा देत इकॉनॉमी रेट हा 7.50 इतका ठेवला होता. तर आयपीएल 2016 मध्ये गुजरात लायन्सकडून शेवटचा सामना खेळला होता. यात त्याने 2 षटकं टाकली होती आणि 25 धावा दिल्या होत्या.
View this post on Instagram
दुसरीकडे, इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज लियाम प्लंकेट 39व्या वर्षी क्रिकेट मैदानात सक्रिय आहे. प्लंकेटने एक किडनी आपल्या वडिलांना दिली आहे. एका किडनीसह प्लंकेट क्रिकेट खेळत आहे. या पर्वात गुजरातने त्याच्यासाठी 41 लाख रुपये मोजले आणि संघात घेतलं आहे.