मुंबई : आयपीएस स्पर्धा 2008 पासून सुरु झाली असून 2024 साली 17 वं पर्व आहे. या स्पर्धेपूर्वी मिनी लिलाव पार पडला. या लिलावात दोन खेळाडूंवर मोजली गेलेली रक्कम पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाचे असून त्यांनी आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. कोलकात्याने मिचेल स्टार्कसाठी 24.75 कोटी आणि हैदराबादने पॅट कमिन्ससाठी 20.50 कोटी रुपये मोजले आहेत. त्यामुळे विदेशी खेळाडूंवर इतकी मोठी रक्कम मोजली गेल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कारण फ्रेंचायसी ठरावीक रक्कम काही विदेशी खेळाडूंना खरेदी करण्यासाठी राखून ठेवत असल्याचं दिसून आलं आहे. आपला संघात घेण्यासाठी मग ती रक्कम आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत असल्याचं दिसत आहे. तर संघातील भारताच्या स्टार खेळाडूंना रिटेन करत असल्याने त्यांना फटका बसत आहे. उदाहरण द्यायचं झालं तर, आरसीबी विराट कोहलीला संघात कायम ठेवण्यासाठी 15 कोटी रक्कम देते, पण विराट कोहली लिलावात असता तर हीच रक्कम 25 कोटींच्या घरात गेली असती.
जसप्रीत बुमराहच्या बाबतीतही असंच काहीसं आहे. या लिलावात वेगवान गोलंदाजांवर पैशांचा पाऊस पडला. इतकंच काय हर्षल पटेलसाठी पंजाब किंग्सने 11 कोटीहून अधिक रक्कम मोजली. पण जसप्रीप बुमराह मुंबई इंडियन्सकडून 12 कोटी मानधन घेत खेळत आहे. जर जसप्रीत बुमराह लिलावात असता तर त्याला मिचेल स्टार्कच्या तुलनेत जास्त पैसे मिळाले असते यात शंका नाही. कारण त्याचा फॉर्म जबरदस्त आहे आणि डेथ ओव्हरमध्ये प्रभावी षटक टाकतो. तसेच दोन बाउंसरच्या नव्या नियमामुळे फायदा झाला असता.
रोहित शर्मा आणि महेंद्र सिंह धोनी यांच्या बाबतही मागच्या काही पर्वात असंच झालं असं म्हणावं लागेल. क्रिकेटचा चढता आलेख असताना फ्रेंचायसींनी रिटेन केल्याने फटका बसला आहे. आहे त्या मानधनात खेळावं लागत आहे. दुसरीकडे, नवोदित खेळाडूही स्टार खेळाडूंच्या आसपास रक्कम घेत आहेत. याबाबत माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे याने रोखठोक मत मांडलं आहे.
आयपीएल लिलावात विदेशी खेळाडूंसाठी एक वेगळी रक्कम असावी. त्यामुळे भारतीय आणि विदेशी खेळाडूंमधील वेतनाची तफावत कमी होईल, असं माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे म्हणाला. फ्रेंचायसींना 8 विदेशी खेळाडू घेण्याची परवानगी आहे. त्यामुळे ठरवून दिलेल्या रकमेतच त्यांना विदेशी खेळाडू खरेदी करता येतील. तसेच भारतीय विदेशी खेळाडूंमधील वेतनातील तफावत दूर करता येईल. लिलावानंतर आकाश चोप्रानेही असंच काहीसं मत व्यक्त केलं होतं.
“बुमराह आणि स्टार्कमध्ये तुम्ही कोणाची निवड कराल? असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर नक्कीच बुमराह असेल. पण त्याला 12 कोटी, तर स्टार्कला 24.75 कोटी रुपये मिळतात. जर खेळाडूंना त्यांच्या क्षमतेनुसार चांगली रक्कम मिळत नसेल तर ते योग्य ठरणार नाही.”, असं आकाश चोप्रा म्हणाला.