IPL : भारताचा दुसरा विराट कोहली बोललं जात होतं, आता केव्हाही घेऊ शकतो निवृत्ती!
आयपीएलमध्ये शतक मारणारा पहिला खेळाडू आता केव्हाही क्रिकेटमधून घेऊ शकतो निवृत्ती, नेमका कोण आहे तो खेळाडू ज्याची कोहलीसोबत तुलना झाली मात्र आता त्याच्यावर अशी वेळ आली.
मुंबई : टीम इंडियामध्ये जागा मिळवण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. या स्वप्नाचा पाठलाग करताना काहींचं हे स्वप्न पूर्ण होतं मात्र काहींचं ते अधूरच राहतं. त्याचबरोबर असे कित्येक खेळाडू आहेत ज्यांना संधी मिळाली पण ते जास्त काही काळ संघात आपलं स्थान टिकवू शकले नाहीत. असाच एका खेळाडू आहे ज्याच पुनरागमन आता अशक्य वाटत आहे परंतु याच खेळाडूची तुलना अनेकवेळा भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीसोबत केली गेली होती.
हा खेळाडू एकदम फिट होता आणि आक्रमक बॅटींगसह तो फिल्डिंगमध्येही चपळ होता. भविष्यातील मोठा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. 2016 साली याच खेळाडूने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 81 बॉलमध्ये 104 धावांची खेळी करत हरलेला सामना भारताला जिंकून दिल होता. त्यावेळी भारताला आता दुसरा विराट कोहली मिळाला असल्याचं बोललं जात होतं. मात्र तसं काही पाहायला मिळालं नाही. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मनीष पांडे आहे.
मनीष पांडेने जबरदस्त पदार्पण केलं होतं. 2015 साली झिम्बाब्वेविरुद्ध 86 चेंडूत 71 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2016 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक करत जिंकून दिलेला सामना ज्यामुळे पांडेचं नाव चर्चेत आलं होतं. मनीष पांडेला आपल्या कामगिरीमध्ये सातत्या ठेवता आलं नाही त्यामुळे तो संघात कायम आत बाहेर असायचा.
मनीष पांडे याने 29 एकदिवसीय आणि 39 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात 566 धावा, टी -20 मध्ये 709 धावा केल्या आहेत. तर 160 आयपीएल सामन्यांमध्ये 3648 धावा केल्या आहेत. गेल्या वर्षीच्या मोसमामध्ये पांडेने 6 सामन्यांमध्ये फक्त 88 धावा केल्या होत्या त्यामुळे त्याला अंतिम 11 मधून वगळण्यात आलं होतं. त्याआधी 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळतानाही फ्लॉप कामगिरीमुळे त्याला संघ व्यवस्थापनाने रीलीज करण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, मनीष पांडे आयपीएलमध्ये शतक मारणारा पहिला खेळाडू आहे. 2009 साली आरसीबीकडून खेळताना त्याने डेक्कन चार्जर्स हैदराबाद विरुद्ध 73 चेंडूत 114 धावा केल्या. त्यावेळी अनिल कुंबळे आरसीबीचा कर्णधार होता. आयपीएल 2023 यंदाच्या हंगामात त्याला दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केलं आहे. जर यावेळीही फ्लॉप गेला तर त्याची आयपीएल कारकीर्दही समाप्त होऊ शकते.