बँक ऑफ बरोडाच्या ग्लोबल ब्रँड अँबेसेडरपदी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेने क्रिकेटपटूला दुसऱ्यांदा ब्रँड अँबेसडर बनवलं आहे. यापूर्वी 2005 मध्ये राहुल द्रविड हा बँकेचा ब्रँड अँबेसडर होता. त्यानंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला ग्लोबल ब्रँड अँबेसडर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. बँक ऑफ बरोडाचे 17 देशांमध्ये अस्तित्व आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय छबी पाहता जागतिक स्तरावर ब्रँडिंगसाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असं बँक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. ऑलिम्पियन पीव्ही सिंधू, भारतीय महिला क्रिकेटपटू शफाली वर्मा आणि टेनिसपटू सुमित नागपाल हे देखील बँकेच्या विविध मोहिमांमध्ये योगदान देत आहेत. बँकेने आपल्या निवेदनात म्हंटलं आहे की, ‘सचिन तेंडुलकर हे मोठं नाव आहे. त्याला जगाच्या कानाकोपऱ्यात ओळखलं जातं. तो भारताच्या विविध गटांचे प्रतिनिधित्व देखील करतो. त्याची लोकप्रियता पाहता बँक ऑफ बरोडाला जागतिक पातळीवर नक्कीच चालना मिळेल.’
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने यावेळी आपलं म्हणणं मांडताना सांगितलं की, ‘बँक ऑफ बरोडा या संस्थेशी निगडीत असल्याचा मला आनंद होत आहे. ही बँक सातत्याने प्रगतीची शिखरं गाठत आहे. आजही या बँकेचं स्थान कायम आहे. एका शतकापूर्वी छोटीशी सुरुवात करत या बँकेने आज मोठी झेप घेतली आहे. उत्कृष्टता, सचोटी आणि नवं काही करण्याच्या तत्वावर काम करणारी ही संस्था माझ्या हृदयाच्या जवळ आहे.’ बँक ऑफ बरोडाचे एमडी देबदत्त चांद यांनी सांगितलं की, ‘आमचं ध्येय स्पष्ट आहे की, देशातील प्रत्येक नागरिकाने बँक ऑफ बरोडाला आपलं बँकिंग भागीदार म्हणून निवडून मास्टरस्ट्रोक खेळावा.’
बँक ऑफ ऑफ बरोडा ही भारतातील सरकारी बँक आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानंतर दुसरी सर्वात मोठी बँक आहे. दरम्यान, अलीकडच्या काळात अनेक बँकांनी क्रीडाविश्वातील नामवंत आणि सिनेतारकांना ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्त केलं आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला ब्रँड अँबेसडर म्हणून नियुक्त केलं आहे. मागच्या आठवड्यात उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने बॉक्सर मेरी कोम आणि फुटबॉलपटू सुनील छेत्री यांची ब्रँड अँबेसडर म्हणून नियुक्ती केली आहे.