विराट कोहलीच्या क्रिकेट कारकिर्दिबाबत सचिन तेंडुलकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला…
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा संपल्यानंतर आता वरिष्ठ क्रिकेटपटूंच्या क्रिकेट कारकिर्दिबाबत चर्चा रंगली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं वय पाहता पुढे खेळणार की नाही? याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. आता यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने उडी घेत विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवानंतर टीम इंडियामध्ये मोठी उलथापालथ होईल असं चित्र आहे. वयस्कर खेळाडूंच्या भविष्याबाबत आता प्रश्न विचारले जात आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी चांगली खेळी केली होती. पण व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये हे दोन्ही खेळाडू खेळणार की नाही? याबाबत साशंकता आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराट कोहली हा 35 वर्षांचा झाला असून या वयात क्रिकेटपटू निवृत्तीची कास धरतात. पण विराट कोहलीचं फिटनेस आणि धावांची भूक पाहता त्याच्यात बरंच क्रिकेट बाकी असल्याचं दिसत आहे. चोरटी धाव घेण्यातही विराट कोहलीची चपळता वारंवार दिसून आली आहे. तरूण खेळाडूंना लाजवेल असं विराटचं फिटनेस आहे. त्यामुळे वनडे आणि टी20 क्रिकेटमधून विराट कोहलीने निवृत्ती घ्यावी की नाही, याबाबत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सांगितलं आहे.
काय म्हणाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर?
सचिन तेंडुलकरने ईएसपीएल क्रिकइंफोशी बोलताना सांगितलं की, “मला पूर्ण विश्वास आहे की विराट कोहलीचा अजूनही थांबलेला नाही. त्याच्यात बरंच क्रिकेट बाकी आहे. अजूनही तो धावांचा डोंगर उभा करू शकतो. कोहलीला देशासाठी बऱ्याच गोष्टी करण्याची भूक आणि इच्छा आहे.” सचिनच्या या वक्तव्यामुळे स्पष्ट होते की, कोहलीने देशासाठी क्रिकेट खेळलं पाहिजे.
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत विराट कोहली 50 शतक ठोकत वनडे क्रिकेटमधील सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला होता. सचिन तेंडुलकरच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये 49 शतकं आहेत. तर विराट कोहलीच्या नावावर 50 शतकांचा विक्रम प्रस्थापित झाला आहे. या बाबतही सचिन तेंडुलकर म्हणाला की, मी आनंदी आहे की हा रेकॉर्ड आपल्या देशाकडे कायम आहे. मी कायम असंच सांगितलं आहे की हा रेकॉर्ड देशाचा आहे.
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत विराट कोहलीने 95.62 च्या सरासरीने 11 सामन्यात 765 धावा केल्या. यात विराट कोहलीने 3 शतकं ठोकली आहेत. तसेच 5 अर्धशतकं नावावर केली आहेत. विराट कोहलीने या स्पर्धेत सर्वाधिक 68 चौकार मारलेत.