INDW vs ENGW : इंग्लंड विरुद्धच्या मोठ्या विजयाचा मास्टरमाइंड मैदानाबाहेर बसला होता! हरमनप्रीत कौरने केला खुलासा
वुमन्स टेस्ट क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड सामना रंगला. हा सामना भारताने मोठ्या फरकाने जिंकला. 347 धावांनी इंग्लंडला पराभूत करत ऐतिहासिक नोंद केली आहे. इतक्या मोठ्या विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हीने नेमकी रणनिती काय होती? या विजयामागे कोणाचा हात होता? याबाबत खुलासा केला आहे.
मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडवर मोठ्या फरकाने विजय मिळवला. दोन्ही देशात आतापर्यंत झालेल्या 39 कसोटी सामन्यातील हा सहावा विजय आहे. हरमनप्रीत कौर हीने कसोटीत 2014 मध्ये पदार्पण केलं होतं. तसेच तिच्या नेतृत्वात पहिल्यांदाच कसोटी सामना खेळला गेला. एकमात्र कसोटी सामन्यात भारताने 347 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे महिला क्रिकेट संघाची सर्वत्र स्तुती होत आहे. यापूर्वी श्रीलंकेने पाकिस्तानला 1998 मध्ये 309 धावांनी पराभूत केलं होतं. त्यामुळे भारताने इंग्लंडला 347 धावांनी पराभूत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. या विजयानंतर हरमनप्रीत कौर हीने या सामन्यासाठी कशी रणनिती होती याबाबत खुलासा केला आहे. कसोटीत कर्णधारपदाचा अनुभव हवा तसा नसतानाही मुख्य प्रशिक्षक अमोल मुझूमदार याची मदत झाली, असं हरमनप्रीत कौर हीने सांगितलं.
विजयाचं श्रेय प्रशिक्षक अमोल मुझूमदार याला देताना हरमनप्रीत कौर हीने सांगितलं की, “आमच्या प्रशिक्षकांनी आमची खूप मदत केली. माझ्या कसोटी संघाचं नेतृत्व करण्याचा कोणताही अनुभव नव्हता. म्हणून मी फक्त त्याच्या निर्णयावर विश्वास ठेवत होती. मग पहिल्या डावात शुभा सतीशला एक गडी बाद झाल्यानंतर उरवण्याचा निर्णय असो की गोलंदाजीतील रणनिती..”
“आज खेळ सुरु झाला तेव्हा सुरुवातीची 40 मिनिटं खूप महत्त्वाची होती. आम्हाला इंग्लंड दबाव कायम ठेवायचा होता. आम्ही सकाळच्या परिस्थितीचा लाभ उचलण्याची रणनिती आखली होती. यासाठी प्रशिक्षकाच्या अनुभवाचा फायदा झाला. यामुळे आम्हाला हा विचार करण्यास मदत मिळाली संघासाठी सर्वश्रेष्ठ काय असेल.”, असंही हरमनप्रीत कौर हीने पुढे सांगितलं.
भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने सर्वबाद 428 धावा केल्या. तसेच या धावसंख्येच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ फक्त 136 धावाच करू शकला. भारताकडे 292 धावांची आघाडी होती. त्यानंतर त्यात टीम इंडियाने 6 गडी गमवून आणखन 186 धावांची भर घातली आणि डाव घोषित केला. भारताने इंग्लंडसमोर 478 धावांचं आव्हान दिलं. इंग्लंडचा संघ फक्त 131 धावा करू शकला आणि भारताने 347 धावांनी विजय मिळवला.