IPL 2023 | ‘पलटण’ एक नंबर! कोलकाताला 5 विकेट्सने पाणी पाजत मुंबई इंडियन्सचा आयपीएल इतिहासात करिष्मा
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक 5 वेळा ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्स टीमच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुंबईने कोलकाताला पराभूत करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
मुंबई | इंडियन प्रीमिअर लीगच्या 16 सिजनमध्ये रविवारी 16 एप्रिल रोजी डबल हेडर सामन्यांचं आयोजन करण्यात आलं. या डबल हेडरमधील पहिला आणि मोसमातील 22 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. मुंबईने टॉस जिंकून कोलकाताला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. केकेआरकडून वेंकटेश अय्यर हा 15 वर्षांनंतर दुसरं शतक ठोकणारा फलंदाज ठरला. वेंकटेशने 104 धावांची शतकी खेळी केली. वेंकटेशने केलेल्या इनिंगमुळे मुंबईला विजयासाठी 186 रन्सचं टार्गेट मिळालं. मुंबईने हे आव्हान 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मुंबईकडून इम्पॅक्ट प्लेअर रोहित शर्मा याने 20 धावा केल्या. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने 43 धावा जोडल्या. तर इशान किशन याने सर्वाधिक 58 धावांची अर्धशतकी खेळी केली.
मुंबई इंडियन्सचा हा मोसमामधील दुसरा विजय ठरला. तर कोलकाता नाईट रायडर्सला पाचव्या सामन्यात तिसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला. मुंबई इंडियन्सने या विजयासह इतिहास रचला आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील हा एकूण 33 वा सामना होता. मुंबईने केकेआरवर मिळवलेला हा 23 वा विजय ठरला. यासह मुंबई आयपीएलमध्ये कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारी टीम ठरली.
विशेष बाब म्हणजे एका टीम विरुद्ध सर्वाधिक सामने जिंकण्याच्या यादीत मुंबई इंडियन्सचं दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईने केकेआरनंतर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सर्वाधिक सामने जिंकले आहे. मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सला 20 वेळा पराभूत केलं आहे. मुंबई व्यतिरिक्त चेन्नईला कुठल्याही संघाला अद्याप 20 पेक्षा अधिक वेळा पराभूत करता आलेलं नाही.
एका टीमविरुद्ध सर्वाधिक विजय
मुंबई इंडियन्स | विरुद्ध टीम केकेआर – 23 विजय. मुंबई इंडियन्स | विरुद्ध टीम सीएसके – 20 विजय. केकेआर | विरुद्ध पीबीकेएस – 20 विजय. सीएसके | विरुद्ध आरसीबी – 19 विजय.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), इशान किशन, कॅमरन ग्रीन, टिळक वर्मा, नेहल वढेरा, टिम डेविड, अर्जुन तेंडुलकर ऋतिक शौकीन, पियूष चावला, रिले मेरेडिथ आणि ड्वेन जॉनसन.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, नारायण जगदीशन, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा.