IND vs PAK : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं पाकिस्तानसोबत क्रिकेटवर काय बोलणं झालं?
India vs Pakistan : टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या 12 वर्षांमध्ये एकही द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आलेली नाही. तसेच दोन्ही संघ हे फक्त आशिया कप आणि आयसीसी स्पर्धेत खेळतात.

भारत आणि पाकिस्तान, 2 शेजारी राष्ट्र. पाकिस्तानने सीमेपलीकडून कायमच शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे. पाकिस्तानचा हा मस्तवालपणा काही करता कमी होत नसल्याने भारताने त्यांच्यासह असलेले बहुतांश व्यवहार आणि संबंध तोडून टाकले आहेत. असं असलं तरी दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांना भारत-पाकिस्तान सामन्यांची प्रतिक्षा कायमच असते. मात्र दोन्ही देशात असलेल्या राजकीय संबंधांचे पडसाद हे इतर क्षेत्रांप्रमाणे क्रीडा क्षेत्रावरही पाहायला मिळाले आहेत. या संबंधांमुळे भारत-पाक यांच्यात द्विपक्षीय क्रिकेट मालिकाही झालेली नाही. तसेच दोन्ही संघ हे केवळ आशिया कप आणि आयसीसीच्या स्पर्धेतच खेळताच.
पाकिस्तानकडे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. मात्र शेजारी देशासह असलेले संबंध आणि आणि खेळाडूंची सुरक्षितता याचा विचार करता केंद्र सरकराने भारतीय क्रिकेट संघाला गेल्या 17 वर्षांपासून पाकिस्तानमध्ये पाठवलेलं नाही. तसेच केंद्र सरकारचा भारतीय क्रिकेट संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही पाकिस्तानमध्ये पाठवण्यास नाही असाच सूर आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सहभागावरुन दोन्ही देशांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. मात्र पाकिस्तानमधून आलेल्या एका बातमीमुळे हे सर्व चित्र बदलणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीच्या दाव्यानुसार, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांसह क्रिकेटवर चर्चा केली आहे. एस जयशंकर हे सध्या एससीओ समीट निमित्ताने पाकिस्तान दौऱ्यावर आहेत.
पाकिस्तान पत्रकार याने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. त्यानुसार, दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये क्रिकेटबाबत चर्चा झाली. तसेच दोन्ही देशांमध्ये क्रिकेटबाबत औपचारिक चर्चा होऊ शकते, असाही दावा केला आहे. मात्र याबाबत भारत किंवा पाकिस्तानकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
क्रिकेटवर चर्चा झाल्याचा दावा
BIG DEVELOPMENT: The foreign ministers of Pakistan and India have discussed cricket diplomacy. The two countries are likely to begin formal talks on cricket. pic.twitter.com/t6dBuRKFbg
— Faizan Lakhani (@faizanlakhani) October 16, 2024
गेल्या 9 वर्षांमध्ये पहिल्यांदाच आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सहभागाचा मुद्दा चर्चेत असताना परराष्ट्र मंत्र्यांच्या पाकिस्तान दौऱ्याला आणखी महत्त्व प्राप्त झालंय. केंद्र सरकारचा टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये पाठवण्यासाठी नाही असाच सूर आहे. भारत पाकिस्तान जाणार की नाही याबाबतचा निर्णय केंद्र सरकार घेणार असल्याचं, बीसीसीआयने आधीच स्पष्ट केलं आहे. तर स्पर्धा पाकिस्तानमध्येच होणार असून सामन्यांचं आयोजन हे हायब्रिड पद्धतीने होणार नसल्याचा दावा पीसीबीकडून केला जात आहे. अशात आता याबाबत काय तोडगा निघतो? याकडेही साऱ्यांचंही लक्ष असणार आहे.