आयपीएल 2024 स्पर्धेत 24.75 कोटींची विक्रमी रक्कम मिळाल्यानंतर मिचेल स्टार्कची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला की…
आयपीएल 2024 लिलावानंतर सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती मिचेल स्टार्कची...त्याला संघात घेण्यासाठी कोलकात्याने सर्वस्व पणाला लावलं होतं. 24.75 कोटी खर्च करून त्याला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. कोलकात्याकडून खेळण्यावर मोहोर लागल्यानंतर मिचेल स्टार्कने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धेत गेल्या 10 वर्षांचा दुष्काळ संपण्याचा कोलकाता नाईट रायडर्सचा प्रयत्न आहे. कोलकात्याने शेवटचं आयपीएल जेतेपद गौतम गंभीरच्या नेतृत्वात जिंकलं होतं. त्यानंतर आतापर्यंत जेतेपदासाठी धडपड सुरु आहे. त्यामुळे संघात चांगल्या खेळाडूंची भर करण्यात आली आहे. श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरला आहे, असून नेतृत्व त्याच्याकडे असेल यात शंका नाही. दुसरीकडे, वेगवान गोलंदाजीच्या ताफ्यात मिचेल स्टार्क आणि चेतन सकारिया यांची भर पडली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कसाठी एक दोन नव्हे 24.75 कोटी रुपये मोजले आहेत. त्याच्या लागलेल्या बोलीने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. 33 वर्षीय मिचेल स्टार्क 8 वर्षांपासून आयपीएल खेळलेला नाही. देशासाठी त्याने असा निर्णय घेतला होता. मात्र आता त्याने आयपीएल खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्याला इतकी मोठी रक्कम मिळाली. आयपीएलमध्ये बाउंसरच्या नियमात बदल झाल्यानंतर वेगवान गोलंदाजांचा भाव वधारला आहे.
कोलकात्यात निवड झाल्यानंतर मिचेल स्टार्कने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “केकेआरच्या चाहत्यानो कसे आहात? मी संघासोबत जॉईन होण्यास उत्सुक आहे. आयपीएलमध्ये कोलकात्याकडून खेळण्यास मी उत्सुक आहे. मी आता स्वत:ला रोखू शकत नाही. ईडन गार्डनमध्ये चाहत्यांसमोर खेळण्याचा एक वेगळाच अनुभव असणार आहे. लवकरच आपण भेटूयात. आमी केकेआर.”, असं ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने सांगितलं.
Welcome back, record-breaker! 🫡 pic.twitter.com/KwSZui8GBj
— KolkataKnightRiders (@KKRiders) December 19, 2023
मिचेल स्टार्कचं आयपीएल करिअर काही खास नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून त्याने आयपीएल 2014 मध्ये पदार्पण केलं होतं. दिल्ली डेअर डेव्हिल्स विरुद्ध खेळताना 4 षटकात 33 धााव देत 1 गडी बाद केला होता. तर शेवटचा आयपीएल सामना 2015 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला होता. यात त्याने 4 षटकात 27 धावा देत 1 गडी बाद केला होता. त्यानंतर आठ वर्षे तो आयपीएलपासून लांब होता. आयपीएलमधील 27 सामन्यातील 26 डावात त्याने गोलंदाजी केली. यात त्यााने 693 धावा देत 34 गडी बाद केले. यात 15 धावा देत 4 गडी बाद करणं ही सर्वोत्तम खेळी होती.
कोलकाता नाईट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंह, रहमानुल्लाह गुरबाज, जेसन रॉय, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, केएस भरत, मिचेल स्टार्क, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, गेस एटकिंसन, अंगकृष रघुवंशी, रमनदीप सिंह, शेरफेन रदरफोर्ड, साकिब हुसैन आणि चेतन सकारिया.