भारतीय महिला क्रिकेटची (Indian Women Cricket Team) ओळख आधी एक-दोन नावांपुरता मर्यादीत होती. आता मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना अशी अनेक नाव आहेत. यात विशेष उल्लेख मिताली राजचा (Mithali Raj) करावा लागला.
तिचं भारतीय क्रिकेटमधलं योगदान खूप मोठं आहे. तिला महिला क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) म्हटलं जातं. मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक असा टप्पा गाठलाय, ज्यामुळे ती इतरांपेक्षा वेगळी ठरते.
आज मिताली राज आपला सहावा वर्ल्डकप खेळतेय. टीमचं कर्णधारपद भूषवण्याची तिची पाचवी वेळ आहे. मितालीच्या वर्ल्डकप प्रवासाची सुरुवात 2000 साली झाली होती. मागच्या 22 वर्षात मिताली पाच वर्ल्डकप स्पर्धा खेळली असून तिच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत.
मितालीने वर्ल्डकपमध्ये 1000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अजूनपर्यंत मितालीला वर्ल्डकप विजयाचा समाधान मिळू शकलेलं नाही. यावेळी हे स्वप्न साकार करण्याचा तिचा प्रयत्न असेल.
मिताली वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 31 सामने खेळली आहे. तिने या 31 सामन्यात 54.23 च्या सरासरीने 1139 धावा केल्या आहेत. दोन वर्ल्डकप फायनलमध्ये संघाचं नेतृत्व करणारी ती जागतिक महिला क्रिकेटमधील एकमेव क्रिकेटपटू आहे.
2005 आणि 2017 मध्ये भारताने वर्ल्डकपचं उपविजेतेपद मिळवलं होतं. दोन्हीवेळा मितालीच टीमची कॅप्टन होती. वर्ल्डकपमध्ये 1000 पेक्षा जास्त धावा करणारी ती भारताची पहिली आणि जगातील पाचवी क्रिकेटपटू आहे.
2013 सालचा वर्ल्डकप मितालीचा चौथा वर्ल्डकप होता. भारतात ही स्पर्धा झाली होती. यात चार सामन्यात 66 च्या सरासरीने तिने 132 धावा केल्या होत्या. यात एक शतक होतं.
मागच्या 2017 च्या वर्ल्डकपमध्येही भारतीय संघ फायनलपर्यंत पोहोचला होता. त्यामध्ये मितालीची महत्त्वाची भूमिका होती. तिने 9 सामन्यात 45.44 च्या सरासरीने 409 धावा केल्या होत्या.
पाकिस्तान विरुद्ध आज कॅप्टन मिताली राजची बॅट तळपली नसेल, पण तिने एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. ती सर्वाधिक वर्ल्डकप खेळणारी महिला क्रिकेटपटू बनली आहे.
तिने भारताचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलरशी बरोबरी केली आहे. सचिन तेंडुलकर त्याच्या करीयरमध्ये सहा वर्ल्डकप स्पर्धांमध्ये खेळला. मितालीचा हा सहावा वर्ल्डकप आहे.