Mohammed Shami | बीसीसीआयकडून मोहम्मद शमी याची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस!
Arjuna Award | केंद्र सरकारकडून आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येतो. अर्जुनाची पुतळा, सन्मानपत्र आणि रक्कम असं या पुरस्काराचं स्वरुप असतं.
मुंबई | नुकत्याच काही दिवसांपूर्वी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेची सांगता झाली. वर्ल्ड कप अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करत सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकून फायनलमध्ये धडक मारली. मात्र एका पराभवाने टीम इंडियाला वर्ल्ड कप गमवावा लागला. मात्र टीम इंडियाने त्याआधीच्या 10 सामन्यांमध्ये सर्व संघांवर एकतर्फी विजय मिळवला. टीम इंडियाच्या विजयात गोलंदाजांनी निर्णायक भूमिका राहिली. त्यातही मोहम्मद शमी याने टीम इंडियासाठी उल्लेखनीय कामगिरी केली. शमीच्या या कामगिरीसाठी बीसीसीआयने त्याच्या नावाची मानाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुरस्कार आहे.
मोहम्मद शमीचं नाव अर्जुन पुरस्काराच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे. एएनआयच्या माहितीनुसार, शमीला अर्जुन पुरस्कार देण्यात यावं यासाठी बीसीसीआयने क्रीडा मंत्रालयाकडे शिफारस केली आहे. त्याआधी या यादीत मोहम्मद शमीच्या नावाचा समावेश नव्हता. मात्र बीसीसीआयच्या विनंतीनंतर अर्जुनच्या नावाचा त्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा कुठेही करण्यात आलेली नाही.
शमीची वर्ल्ड कपमधील कामगिरी
मोहम्मद शमीने 13 व्या वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या. शमीने अवघ्या 7 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. तसेच शमीने न्यूझीलंड विरुद्ध 7 विकेट्स घेत एकहाती सामना फिरवला होता. शमीने वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये ही कामगिरी केली होती. शमीच्या या निर्णायक कामगिरीमुळे टीम इंडियाने सामन्यात कमबॅक करत सामना जिंकला.
मोहम्मद शमीची क्रिकेट कारकीर्द
मोहम्मद शमी याने 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. शमीने आतापर्यंत टीम इंडियाचं 64 कसोटी, 101 वनडे आणि 23 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. शमीने कसोटीत 229, वनडेत 195 आणि टी 20 मध्ये एकूण 24 विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान टीम इंडिया दक्षिण आफ्रिके विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मोहम्मद शमी या मालिकेतून टीम इंडियात कमबॅक करु शकतो. मालिकेतील पहिला सामना हा 26 डिसेंबरला सेंच्युरियन येथे खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा सामना 3 जानेवारीपासून केपटाऊन येथे होणार आहे.