Mohammed Siraj याची ऐतिहासिक कामगिरी, श्रीलंका विरुद्ध महारेकॉर्ड
Mohammed Siraj | टीम इंडियाला सुपर 4 मॅचमध्ये श्रीलंकेच्या दुनिथ वेल्लालागे याने फिरकीच्या जोरावर जेरीस आणलं होतं. आता मोहम्मद सिराजने 6 विकेट्स जशास तशी परतफेड केली आहे.
कोलंबो | टीम इंडियाचा मिया भाई अर्थात मोहम्मद सिराज याने श्रीलंका विरुद्ध आशिया कप 2023 फायनलमध्ये धमाका केला आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत जे कुणालाच जमलं नव्हतं ते एकट्या मोहम्मद सिराजने करुन दाखवलंय. सिराजने श्रीलंकेच्या गोलंदाजांना दे दणादण धक्के देत इतिहास रचला आहे. टॉस जिंकून मोठ्या आत्मविश्वासाने श्रीलंकेचे बॅट्समन मैदानात बॅटिंगसाठी आले. मात्र जसप्रीत बुमराह याच्या मदतीने मोहम्मद सिराज याने लंकादहन केलं.
जसप्रीत बुमराह याने श्रीलंकेला पहिल्याच ओव्हरमध्ये धक्का देत टीम इंडियाला शानदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर मोहम्मद सिराज बॉलिंग टाकायला आला. सिराजने या ओव्हरमध्ये पूर्ण मॅचच टीम इंडियाच्या बाजूने झुकवली. सोबत त्याने मोठा विक्रम केला. सिराजने एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेतल्या. सिराज यासह टीम इंडियाकडून एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला. मोहम्मद सिराज याने एका ओव्हरमध्ये अनुक्रमे पाथुम निसांका, सदीरा समाराविक्रमा, चरीथ असलंका आणि धनंजया डी सिल्वा या चौघांना एकाच ओव्हरमध्ये गुंडाळलं.
मोहम्मद सिराज याच्या भेदक माऱ्याच्या जोरावर श्रीलंका अवघ्या 15.2 ओव्हरमध्ये अवघ्या 50 धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज याने अवघ्या 7 ओव्हरमध्ये 21 धावांच्या मोबदल्यात सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. सिराजने या 7 पैकी 1 ओव्हर ही मेडन टाकली. तसेच उपकर्णधार हार्दिक पंड्या याने 3 विकेट्स घेतल्या. हार्दिकने दुनिथ वेल्लालागे, प्रमोद मधुशन आणि मथीशा पथीराणा या तिघांना आऊट केलं. तर जसप्रीत बुमराह याने 1 विकेट घेतली.
आशिया कप 2023 फायनलसाठी टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली. केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
आशिया कप फायनलसाठी श्रीलंकेचे 11 शिलेदार | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन आणि मथीशा पाथिराना.