IPL : पैसा आज येईल उद्या जाईल, IPL पेक्षा कायम माझं देशासाठी खेळायला प्राधान्य राहिलं- स्टार्क
WTC FINAL 2023 : आयपीएल महत्त्वाची की देशाचे सामने असा सवाल चाहत्यांनी केला आहे. मात्र अशातच ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मिचेल स्टार्क याने यासंदर्भात केलेल्या वक्तव्याने भारतीय खेळाडूंवरील रोष आणखी वाढला आहे.
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल 2023 मध्ये टीम इंडियाचा मानहानिकारक पराभव झाला होता. या पराभवानंतर संघातील मुख्य खेळाडूंवर टीका होताना दिसत आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणारे खेळाडू अपयशी होताना दिसले, याचाच धागा पकडत खेळाडूंसाठी आयपीएल महत्त्वाची की देशाचे सामने असा सवाल चाहत्यांनी केला आहे. मात्र अशातच ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मिचेल स्टार्क याने यासंदर्भात केलेल्या वक्तव्याने भारतीय खेळाडूंवरील रोष आणखी वाढला आहे.
काय म्हणाला मिचेल स्टार्क?
मी आयपीएलचा आनंद लुटला, यॉर्कशायरकडून काऊंटी क्रिकेटही खेळलो, पण ऑस्ट्रेलियासाठी खेळणे हे माझं पहिलं प्राधान्य आहे. मला काही हरकत नाही कारण पैसा येईल आणि जाईल पण मला मिळालेल्या संधींबद्दल मी कृतज्ञ आहे. मला पुन्हा आयपीएल खेळायला आवडेल पण ऑस्ट्रेलियासाठी कोणत्याही फॉरमॅटमध्ये चांगलं खेळणं हे माझे ध्येय असल्याचं मिचेल स्टार्कने म्हटलं आहे.
स्टार्कचे अनेक सहकारी खेळाडू आयपीएल, बिग बॅशसह जगातील आघाडीच्या टी-20 लीगमध्ये खेळत आहेत, पण स्टार्क या मोहापासून दूर राहिला. देशासाठी खेळणं याला खेळाडूंनी प्राधान्य द्यायला हवं आणि युवा क्रिकेटपटूंनीसुद्धा असाच विचार करण्याची गरज असल्याचं स्टार्क म्हणाला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांना फाटा दिला. दोन्ही डावात 2-2 विकेट घेतल्या होत्या. स्टार्क जे बोलला त्याने टीम इंडियामधील मोठ्या खेळाडूंना मिरची लागणार यात काही शंका नाही.
आताच्या युवा खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याचं आकर्षण वाढलं आहे. एकवेळ देशांतर्गत क्रिकेटमधील टूर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी खेळाडू थोडा विचार करतील, पण आयपीएलसाठी एका पायावर ते तयार असतात. मात्र यांचा त्यांनाही फटका बसताना दिसत आहे. कामगिरीमध्ये सातत्य न राहिल्याने युवा खेळाडू दुर्लक्षित होताना दिसत आहेत.