MPL Final 2023 RJ vs KT | रत्नागिरी जेट्स एमपीएल चॅम्पियन,कोल्हापूर विरुद्ध बॅटिंग न करताच विजयी
MPL Final 2023 RJ vs KT | रत्नागिरी जेट्स टीम महाराष्ट्र प्रीमिअर लीग स्पर्धेतील पहिल्या सत्रातील चॅम्पियन ठरली आहे. रत्नीगिरीने कोल्हापूर टस्कर्सवर विजय मिळवला आहे.
पुणे | एमपीएलला पहिलीवहिली चॅम्पियन टीम मिळाली आहे. रत्नागिरी जेट्स टीम महाराष्ट्र प्रीमिअर लीग स्पर्धेतील पहिल्या मोसमातील चॅम्पियन ठरली आहे. महाअंतिम सामन्यात रत्नागिरी जेट्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स आमनेसामने होते. कोल्हापूर टस्कर्सच्या कॅप्टन्सीची जबाबदारी अनुभवी केदार जाधव याच्याकडे होती. तर अझीम काझी रत्नागिरी जेट्सचं नेतृत्व करत होता. या सामन्याचं आयोजन हे पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. गुरुवारी 29 जून रोजी पावसामुळे सामना राखीव दिवशी म्हणजेच 30 जून रोजी खेळवण्याचं ठरलं. मात्र राखीव दिवशीही पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे रत्नागिरीला विजयी घोषित करण्यात आलं. पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर असल्याने रत्नागिरी जेट्सला विजयी जाहीर केलं.
रत्नागिरी जेट्स एमपीएल चॅम्पियन
RATNAGIRI JETS IT IS! ??
The match has been abandoned and the team finishing higher on the table has been declared as the winner of #ShriramCapitalMPL2023
CONGRATULATIONS to the Jets ??#ThisIsMahaCricket #MPL #MPLT20 #ratnagirijets #kolhapurtuskers #Champions pic.twitter.com/wRPZ82fzhK
— MPLT20Tournament (@mpltournament) June 30, 2023
राखीव दिवशी क्रिकेट चाहते मोठ्या उत्साहाने अंतिम सामन्यासाठी सज्ज होते. राखीव दिवशीही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे टॉसला विलंब झाला. मात्र काही वेळानंतर टॉस पार पडला. रत्नागिरी जेट्सने टॉस जिंकला. कॅप्टन अझीम काझी याने कोल्हापूर टस्कर्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं.
कोल्हापूरचा डाव आणि पावसाची बॅटिंग
कोल्हापूरच्या बॅटिंगला सुरुवातही झाली. मात्र यादरम्यान पाऊस पुन्हा कोसळला. त्यामुळे खेळ थांबला. पुन्हा सामन्याला सुरुवात झाली, पुन्हा पाऊस आला. तोवर कोल्हापूरने 16 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 80 धावा केल्या होत्या. तरनजित सिंह 10 आणि कीर्तीराज वाडेकर 1 धावेवर नाबाद परतले.
कोल्हापूरकडून 16 ओव्हरपर्यंत कॅप्टन केदार जाधव याने सर्वाधिक 32 धावांची खेळी केली. नौशाद शेख याने 12 धावा केल्या. सिद्दार्थ म्हात्रे याला भोपळाही फोडता आला नाही. तर उर्वरित 5 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. रत्नागिरीकडून प्रदीप दधे याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. निकीत धुमाळ आणि कुणाल थोरात या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर विजय पावले याने 1 विकेट घेतली.
पाऊस थांबलाच नाही
कोल्हापूरच्या बॅटिंगदरम्यान 16 व्या ओव्हरनंतर पावसाची एन्ट्री झाली. त्यानंतर पावसाच्या थांबण्याची प्रतिक्षा प्रत्येकाला होती. याच प्रतिक्षेत तब्बल 3 तास निघाले. त्यामुळे 3 तासांचा खेळ वाया गेला. त्यामुळे अखेर पॉइंट्स टेबलमध्ये अव्लस्थानी असल्याने रत्नागिरीला विजयी घोषित करण्यात आलं.
विजयी संघाला किती रक्कम?
दरम्यान रत्नागिरी जेट्स टीमला 50 लाख रुपये बक्षिस रक्कम देण्यात आली. तर रनरअप कोल्हापूर टस्कर्सला बक्षिस म्हणून 25 लाख रुपये मिळाली. उपविजेत्या संघाचा अंकित बावणे या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. त्यामुळे अंकित हा ऑरेन्ज कॅप विजेता ठरला. तर पुणेरी बाप्पा टीमचा सचिन भोसले याने पर्पल कॅप पटकावली.
रत्नागिरी जेट्स प्लेइंग इलेव्हन | अझीम काझी (कॅप्टन), धीरज फटांगरे, प्रीतम पाटील, किरण चोरमले, निखील नाईक (विकेटकीपर), दिव्यांग हिंगनेकर, निकीत धुमाळ, विजय पावले, कुणाल थोरात, प्रदीप दधे आणि अस्कान काझी,
कोल्हापूर टस्कर्स प्लेइंग इलेव्हन | केदार जाधव (कॅप्टन), निहाल तुस्माद, अत्मान पोरे, मनोज यादव, अक्षय दरेकर, तरनजित सिंह धिल्लो, निखिल मदास, अंकित बावने, साहिल औताडे, नौशाद शेख आणि सिद्दार्थ म्हात्रे.