Mohammed Shami | शमीला प्लीज अटक करू नका, दिल्ली पोलिसांची मुंबई पोलिसांना विनंती; काय होता गुन्हा ? असं काय घडलं ?
वर्ल्डकप 2023च्या सेमीफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने शानदार कामगिरी करत 7 विकेट्स घेतल्या. शमीच्या या शानदार कामगिरीबद्दल दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी एक मजेदार पोस्ट केली आहे.
मुंबई | 16 नोव्हेंबर 2023 : वर्ल्डकप 2023च्या सेमीफायनलच्या सामन्यात न्यूझीलंडला 70 धावांनी हरवून भारतीय संघाने चौथ्यांदा या जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 4 विकेट्स गमावत 397 धावा केल्या होत्या. तर नेतर फलंदाजीस उतरलेला न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 48.5 षटकात 327 धावा करत ऑलआऊट झाला. विराट कोहली, श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळीने भारताने धावांचा मोठा डोंगर उभारला. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (mohammed shami) अप्रतिम गोलंदाजी करत ५७ धावांत ७ बळी घेतले. त्यांच्या या सांघिक कामगिरीमुळे भारताने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला.
कालच्या विजयाचा शिल्पकार असलेल्या मोहम्मद शमीवर संपूर्ण जगातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरही त्याच्या कौतुकाच्या अनेक पोस्ट्स शेअर झाल्या असून तो सध्या ट्रेंडिंग आहे. याच दरम्यान शमीच्या या शानदार कामगिरीबद्दल दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी एक मजेदार पोस्ट केली.
दिल्ली आणि मुंबई पोलीसांची पोस्ट
शमीच्या या शानदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावर शमी अजूनही ट्रेंडमध्ये आहे. शमीच्या कामगिरीनंतर आणखी एक पोस्ट शेअर झाली, ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. शमीच्या उत्तम परफॉर्मन्सनंतर दिल्ली पोलिसांनी X (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुंबई पोलिसांना टग करत एक पोस्ट शेअर केली, जी व्हायरल झाली. सामन्यानंतर दिल्ली पोलिसांनी लिहिले की, ‘मुंबई पोलीस, आम्हाला आशा आहे की आज झालेल्या हल्ल्यासाठी तुम्ही मोहम्मद शमीला अटक करणार नाही.’
मुंबई पोलिसांनीही त्यांच्या या पोस्टला लागलीच प्रत्युत्तर दिले. ‘दिल्ली पोलिस, (शमी) असंख्य लोकांची मने चोरण्याचे (मन जिंकण्याचे) कलम लावायला तुम्ही विसरलात आणि सहआरोपींची यादीही दिली नाही.’ या सामन्यात उत्तम कामगिरी करणारे विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल यांच्याकडे मुंबई पोलिसांचा इशारा होता. या दोन्ही पोस्ट्स अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाल्या .
You missed pressing charges of stealing innumerable hearts @DelhiPolice and listing a couple of co-accused too😂
P.S.: Dear citizens, both the departments know the IPC thoroughly and trust you for a great sense of humour 😊 https://t.co/TDnqHuvTZj
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) November 15, 2023
शमीची तूफान कामगिरी, तोडली महत्वपूर्ण भागीदारी
कालच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने न्युझीलंड समोर 397 धावांचे ‘विराट’ लक्ष्य ठेवले. भारतीय संघ हा सामना आरामात जिंकेल, असंच प्रत्येकाला वाटत होतं. त्यानंतर न्युझीलंडचा संघ बॅटिंगसाठी उतरल्यावर त्यांची सुरूवात थोडी अडखळत झाली आणि 39 धावांतच त्यांनी दोन विकेट्स गमावल्या. पण त्यानंतर मिशेल आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 181 धावांची मोठी भागीदारी केल्यावर भारत सामना गमावतो की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
मात्र त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा शमीकडे चेंडू सोपवला आणि त्याने तो विश्वास सार्थ ठरवला. शमीने केन विल्यमसनची महत्त्वाची विकेट घेत ही मोठी भागीदारी तोडली. शमीने त्या ओव्हरमध्ये दोन बळी घेतले. यानंतर न्यूझीलंड संघ दडपणाखाली आला. मात्र, फिलिप्स आणि मिशेल यांच्यात पाचव्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी झाली जी बुमराहने मोडली. नंतर शमीने आणखी 3 विकेट घेतल्या आणि संपूर्ण संघ 327 पर्यंत पोहोचून गडगडला. या शानदार कामगिरीसाठी शमीला ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
तत्पूर्वी भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर 397 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. कर्णधार रोहित शर्माने 29 चेंडूत 47 धावा केल्या. शुभमनने गिलने 80 तर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने शानदार शतकी खेळी केली. कोहली 113 चेंडूत 117 धावा करून बाद झाला,त्यासोबतच त्याने मास्ट्र ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रमही मोडला. वानखेडे स्टेडिअमवर सचिसमोरच विराटने त्याच्या करिअरमधील 50वं शतक झळकावलं. तर श्रेयसने स्फोटक फलंदाजी करत 70 चेंडूत 105 धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये केएल राहुलने 20 चेंडूत 39 धावांची स्फोटक खेळी खेळली.